चौराईमुळे पेंचच्या पाणीसाठ्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:20 AM2017-09-02T01:20:22+5:302017-09-02T01:21:11+5:30

मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यात प्रचंड घट निर्माण झाली.

Due to the square width of the screw water screws | चौराईमुळे पेंचच्या पाणीसाठ्यात घट

चौराईमुळे पेंचच्या पाणीसाठ्यात घट

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र-मध्य प्रदेश शासनाची लवकरच बैठक : मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाणीसाठ्यात प्रचंड घट निर्माण झाली. त्यामुळे नागपूर जिल्हा आणि परिसरातील शेतकºयांच्या सिंचनाला बसणारा फटका आणि भविष्यात निर्माण होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारची बैठक लवकरच घेतली जाईल, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, मुख्य सचिव सुमित मलिक, अति. मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ऊर्जा प्रधान सचिव अरविंद सिंह, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, नगर विकास प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, जलसंपदा विभागाचे सचिव आदींच्या उपस्थितीत चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पातील पाण्यात निर्माण झालेली घट याविषयावर उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. तीत येत्या दोन महिन्यात या समस्येवरील उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व प्रकल्प अहवाल तयार करून आवश्यक ती परवानगी प्राप्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. या प्रकल्पासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करून डिसेंबरच्या अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
सन १९६४ च्या करारानुसार मध्य प्रदेशला ३५ टीएमसी व महाराष्ट्राला ३० टीएमसी पाणी मिळत होते. या पाण्यात घट झाल्यापासून मध्य प्रदेशला २४.७७ आणि महाराष्ट्राला २०.९३ टीएमसी पाणी मिळत आहे. सध्या मध्य प्रदेश करारनाम्यापेक्षा जास्त पाणी वापरत आहे. तोतलाडोह धरणाच्या उर्ध्वबाजूस चौराई धरणापर्यंत ७०.५१ किमी लांबीत मध्य प्रदेश शासनाने १० बंधारे बांधून पाणी अडविले आहे. तसेच १ जून २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत फक्त २३५ दलघमी पाणी आले आहे. त्यामुळेच पेंच व नवेगाव खैरी मिळून फक्त २३४ दलघमी पाणीसाठी उपलब्ध आहे. पेंच, नवेगावखैरी व तोतलाडोह धरणात किमान ३०० दलघमी पाणी पिण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. खरीप सिंचनासाठी एकदा पाणी सोडले तर १५० दलघमी पाणी लागणार आहे.
त्यामुळे जलसाठा ४५० दलघमी झाल्याशिवाय सिंचनासाठी पाणी सोडणे शक्य नाही. परिणामी सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य आहे. यावर उपाययोजना म्हणून वेकोलि नागपूर येथील इंदर, कामठी, गोंडगाव खाणीतील पाणी उपसा सिंचना योजनांद्वारे सिंचनासाठी वापरणे आवश्यक आहे. यासाठी २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कन्हान नदीतील पाण्याचा वापर करून पेंच प्रकल्पातील कमी पाण्याची तूट भरून काढण्यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात आल्या.
या बैठकीला माजी आ. आशिष जयस्वाल, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे, मुख्य अभियंता चव्हाण उपस्थित होते.
असे आहे पेंचचे पाणी वाटप
पेंच नदीवरील प्रकल्पांतर्गत नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमधील एक लाख चार हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या प्रकल्पात तोतलाडोह, नवेगाव खैरी आणि खिंडसी तलाव यांचा समावेश आहे. या प्रकल्पातून नागपूर शहरासाठी १९० दलघमी आणि औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी ६७ दलघमी पाणीपुरवठा करण्यात येतो. नागपूर शहर व जवळपासचा इतर ग्रामीण भाग व ग्रामीण पाणीपुरवठा, पाण्याचे बाष्पीभवन लक्षात घेता पिण्यासाठी ३५० दलघमी पाण्याची आवश्यकता राहणार आहे. सध्या २९० दलघमी पाणी उपलब्ध आहे.
नागनदीचे पाणी पेंचच्या उजव्या कालव्यात सोडणार
कोराडी, खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी नागपूरच्या भांडेवाडी आणि नागनदीचे पाणी एसटीपीद्वारे वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. नागनदीचे पाणी गोसेखुर्द धरणात सोडण्यात येऊ नये. हे पाणी लिफ्ट करून पेंचच्या उजव्या कालव्यात सोडण्यासाठी प्रकल्प तयार करण्यात यावा. तसेच भंडारा जिल्ह्यात वैनगंगेवर व सूर नदीवर बॅरेज बांधून सदर पाणी पेंचच्या डाव्या कालव्यातील पुच्छ भागात सोडण्यासाठी प्रकल्प तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. गोसेखुर्द धरणातील पाणी एनटीपीसी, मौदा ऐवजी पेंच प्रकल्पात कसे वापरता येईल यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिले.

Web Title: Due to the square width of the screw water screws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.