एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:22 PM2018-06-08T23:22:29+5:302018-06-09T00:19:10+5:30
वेतनवाढीवर नाराज असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा संप पुकारल्यामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. नागपूर विभागातील ७० टक्के फेऱ्या संपामुळे रद्द करण्याची पाळी प्रशासनावर आली. दरम्यान संपामुळे नागपूर विभागाचे ३५ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती असून यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्याचे पाहावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेतनवाढीवर नाराज असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुन्हा संप पुकारल्यामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. नागपूर विभागातील ७० टक्के फेऱ्या संपामुळे रद्द करण्याची पाळी प्रशासनावर आली. दरम्यान संपामुळे नागपूर विभागाचे ३५ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती असून यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्याचे पाहावयास मिळाले.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घोषित केलेल्या वेतनवाढीवर नाराजी व्यक्त करुन एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. विभागातील ७० टक्के कर्मचारी गैरहजर होते. संप पुकारण्यात आल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळीच गणेशपेठ आगारात घोषणाबाजी करून बसेस बाहेर काढण्यास मनाई केली. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दिवसाकाठी बसेसच्या १०५२ फेऱ्या होतात. संपामुळे फक्त २७४ फेऱ्या पूर्ण झाल्या असून ७७८ फेऱ्या रद्द करण्याची पाळी महामंडळावर आली. गणेशपेठ स्थानकावर प्रवासी पोहोचल्यानंतर त्यांना संप पुकारल्याचे समजले. त्यामुळे प्रवासासाठी त्यांना खाजगी वाहतुकीकडे वळण्याची पाळी आली.
नागपूर विभागातील आकडेवारी
एकूण बसेस ६००
दैनंदिन फेऱ्या १०५२
पूर्ण झालेल्या फेऱ्या २७४
रद्द केलेल्या फेऱ्या ७७८
एकूण कर्मचारी २८००
चालक १ हजार
वाहक १ हजार
कार्यशाळा कर्मचारी ५००
कार्यालयीन कर्मचारी ३००
खाजगी गाड्यांना वाहतुकीची परवानगी
प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना महामंडळाकडून विभाग नियंत्रक कार्यालयाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार खासगी गाड्यांनाही प्रवासी वाहतुकीची मान्यता देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयात एक कक्ष सुरू करण्यात आला आहे.
खासगी बसेस व वाहनास प्रवासी वाहतुकीची परवानगी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एस.टी.) च्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहनास संपाच्या काळात प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटर वाहन अधिनियम १९८८ (चा ५९)चे कलम ६६ चे उपकलम (३) चा खंड (एन) अन्वये खासगी वाहनांना संप कालावधीकरिता सूट देण्यात आली आहे. संप कालावधीत प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) नागपूर यांनी केले आहे.