मुंबईच्या खराब हवामानामुळे नागपुरातून हृद्य गेले एक दिवस उशीरा
By सुमेध वाघमार | Published: May 14, 2024 06:36 PM2024-05-14T18:36:15+5:302024-05-14T18:36:39+5:30
अवयवदानासाठी जैन कुटुंबियांचे सहकार्य : चौघांना मिळाले नवे आयुष्य
नागपूर : एका ‘ब्रेन डेड’ अवयवदात्याचे हृद्य सोमवारी मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलला जाणार होते. परंतु मुंबईतील खराब हवामानामुळे विमानसेवा प्रभावित झाली. यामुळे एक दिवस थांबवून आज मंगळवारी अवयवदान झाले. विशेष विमानाने हृद्य मुंबईला नेण्यात आले. अवयवदात्याच्या कुटुंबियांच्या सहकार्यामुळेच हे शक्य होऊ शकले.
जिनेन्द्र जैन (४४) रा. खरबी नागपूर त्या अवयवदात्याचे नाव. जैन यांचे शंकर नगर येथे पान मटेरियले दुकान आहे. ११ मे रोजी रात्री ११ वाजात दुकान बंद करून ते घरी जाण्यास निघाले असताना पंचशील चौकात त्यांचा अपघात झाला. सीताबर्डी कडून आलेल्या भरधाव कराने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. लागलीच त्यांना केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांच्या एका पथकाने ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत झाल्याची घोषणा केली. हॉस्पिटलचे डॉ. कमाल भुतडा व त्यांच्या चमूने याची माहिती जैन यांच्या कुटुंबियांना देऊन अयवदानासाठी समुपदेशन केले. अचानक झालेल्या घटनेने जैन कुटुंब हादरून गेले होते. मात्र त्या दु:खातही त्यांचे वडील रमेश जैन (६५), जिनेन्द्र यांच्या पत्नी भावना (३९) आणि भाऊ योगेश (३२) यांनी अवयवदानाला संमती दिली. याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला (झेडटीसीसी) देण्यात आली. समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. डॉ. राहुल सक्सेना यांच्या मार्गदर्शनात प्रत्यारोपण समन्वयक दीनेश मंडपे यांनी अवयवदानाची प्रक्रीया पार पडली. चौघांना अवयवदान होऊन नवे आयुष्य मिळाले.
-सोमवारी होणारे प्रत्यारोपण मंगळवारी झाले
‘झेडटीसीसी’ने नियमानुसार राज्य व राज्याबाहेर हृद्य उपलब्ध असल्याचा अलर्ट दिला. सोमवारी मुंबईच्या सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमधील एका ५३ वर्षीय रुग्णाला हृद्य दान करण्याचा निर्णय झाला. त्याच दिवशी नागपुरात जैन यांचे अवयवदान होणार होते. परंतु मुंबईच्या खराब हवामानामुळे विशेष विमान नागपुरला पोहचू शकले नाही. यामुळे मंगळवारी सकाळी अवयवदान झाले.
-रामदासपेठ ते विमानतळ ग्रीन कॉरिडॉर
रामदासपेठ येथील केअर हॉस्पिटल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टÑीय विमानतळ असे ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून रुग्णवाहिकेतून हृद्य नेण्यात आले. यकृत नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमधील ३६ वर्षीय तरुणाला, एक किडनी के अर हॉस्पिटलमधील ४६ वर्षीय पुरुष रुग्णाला तर दुसरी किडनी आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या ३८ वर्षीय तरुणाला दान करण्यात आली.
-आतापर्यंत केवळ १९ हृद्याचे दान
२०१३ ते आतापर्यंत १५० ब्रेन डेड व्यक्तीकडून अवयवदान झाले असलेतरी मोजक्याच दात्याकडून १९ हृद्याचे दान होऊ शकले. यात २०१७ मध्ये ५, २०१८ मध्ये ४, २०१९ मध्ये ३, २०२१ मध्ये २, २०२३मध्ये ४ तर २०२४ मधील हे पहिले हृद्यदान होते.