सततच्या 'चेन पुलिंग'मुळे आठ महिन्यात १०७५ रेल्वेगाड्यांचा खोळंबा, ७९३ गुन्हे दाखल
By नरेश डोंगरे | Published: December 9, 2023 12:57 AM2023-12-09T00:57:24+5:302023-12-09T00:58:05+5:30
गेल्या सात महिन्यात अशाच प्रकारे रेल्वेची साखळी ओढली गेल्याने तब्बल १०७५ रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
नागपूर : आपतकालिन स्थितीत प्रवाशांना मदत व्हावी म्हणून रेल्वे गाडीची साखळी ओढण्याची (अलार्म चेन पुलिंग) व्यवस्था असते. मात्र, काही उपद्रवी मंडळी उठसुठ रेल्वेगाडची साखळी ओढत असल्याने त्याचा गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होत आहे. गेल्या सात महिन्यात अशाच प्रकारे रेल्वेची साखळी ओढली गेल्याने तब्बल १०७५ रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
आणीबाणीची स्थिती असल्यास रेल्वे गाडी थांबविता यावी म्हणून ट्रेनच्या प्रत्येक डब्यात साखळी (चेन) दिलेली असते. ती ओढल्यास ट्रेन थांबते. विनाकारण ही साखळी ओढू नये, अन्यथा दंड आणि कारावासाची शिक्षा होईल, असा स्पष्ट ईशारा बाजूला लिहून असतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत काही समाजकंटक विनाकारण चेन पुलिंग करतात. अर्थात चेन पुलिंगमुळे लोको पायलटला संकेत मिळते अन् तो ट्रेन थांबवितो. त्यानंतर नेमकी कुणी आणि कशासाठी चेनपुलिंग केली, त्याचे कारण शोधले जाते अन् किमान १० मिनिटानंतर ही ट्रेन पुढे निघते. अर्थात् या गाडीत चेन पुलिंग झाल्यामुळे आणि ती थांबल्यामुळे एकट्या तिच्या वेळापत्रकावर नव्हे तर त्या गाडीच्या मागून धावणाऱ्या अन्य सर्वच गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.
नागपूर विभागात २४१ गाड्यांवर परिणाम
विनाकारण चेनपुलिंग झाल्याने एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात एकूण १०७५ गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. त्यापैकी मुंबई विभागात ३४४ मेल / एक्सप्रेस, भुसावळ विभागात ३५५, नागपूर विभागात २४१, पुणे विभागात ९६ तर सोलापूर विभागात ३९ गाड्यांवर परिणाम झाला. या सर्वच गाड्या विलंबाने धावल्या. त्यामुळे या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल, दंडही वसूल
रेल्वे कायद्याच्या कलम १४१ अन्वये विनाकारण चेन पुलिंग करणे गुन्हा आहे. तो सिद्ध झाल्यास आर्थिक दंड किंवा कारावास किंवा दोन्ही शिक्षा संबंधित व्यक्तीला होऊ शकतात. मध्ये रेल्वेने गेल्या आठ महिन्यात अशा प्रकारे ७९३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आणि त्यांच्याकडून २.७२ लाखांचा दंडही वसूल केला.