उपराजधानीतील विकास कामे, खड्डे अन् चौकामुळे वाहतुकीचे वाजले तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2022 08:47 PM2022-08-12T20:47:50+5:302022-08-12T20:49:13+5:30
Nagpur News गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागल्याचे वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
नागपूर : रस्त्यावरील खड्डे, विकास कामांमुळे शहरातील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. १५१ हून अधिक चौक अथवा रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना तासनतास प्रतिक्षा करावी लागते. गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागल्याचे वाहतूक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
उपराजधानीचा चौफेर विकास होत आहे. सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. मात्र याच सिमेंट रस्त्यांमुळे शहरात जागोजागी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. पाण्यात बुडणारी वाहने व वाहतुक कोंडीसाठी नागरिक सिमेंट रस्त्यांचे कंत्राटदारांना दोषी धरत आहे. वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास वाहन चालक सर्वप्रथम पोलिसांना फोन करून विचारणा करतात. मात्र पाणी साचणे, खड्डे व विकास कामामुळे वाहतूक विस्कळीत होत असेल तर पोलीस तरी कार करणार?
नागरिकांच्या तक्रारी व समस्या विचारात घेता पोलिसांनी काही दिवसापूर्वी शहरातील रस्त्यांचा सर्वे केला. यात १५१ ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे पुढे आले. यात शहरातील काही महत्वाचे चौक व रस्त्यांचा समावेश आहे. अशा रस्त्यावर वाहनांची कायम वर्दळ असते. वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतर ती सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना काही तास लागतात. वाहतूक कोंडीत अडकलेले नागरिक स्थानिक प्रशासनासोबतच पोलिसांनाही दोषी धरतात.
रस्त्यांवरील खड्ड्यामुळे शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शहराचा कोणताही भाग यातून सुटलेला नाही. पोलिसांच्या सर्वेक्षणात ६३ ठिकाणी खड्डे आढळून आले. यात सर्वाधिक सीताबडीं, धंतोली, अंबाझरी, सदर पोलीस स्टेशन परिसराचा समावेश आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. वाहनांच्या लांब रांगा लागतात.
काही दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचल्याने ४४ ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. साचलेले पाणी तातडीने काढण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या नाही. यामुळे तासन्तास वाहनधारक वाहतूक कोंडीत अडकले होते.
शहरातील काही ठिकाणी विकास कामांच्या नावाखाली रस्ता, उड्डाणपूल, आरओबी आदी कामे सुरू आहेत. या कामामुळे वाहतूक वळविण्यात आली आहे. यामुळे ४४ मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
विकास कामांना विलंबाचा रेकॉर्डच
विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या विकास कामांना होत असलेला विलंब एक नवीन रेकॉर्ड निर्माण होण्याची शक्यता आहे. पारडी उड्डाणपुलाचे काम दिर्घ कालावधीपासून सुरू आहे. हे काम सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. हा कालावधी संपून दोन वर्षे झाली. परंतु अजुनही काम अपूर्ण आहे. या मार्गावर २४ तास वाहतूक कोंडी असते. यावर नियंत्रण म्हणून काही दिवसापूर्वी अवजड वाहनांच्या वाहतुकीला निर्बंध घालण्यात आला. यामुळे वाहनांना २२ किलोमीटर फेऱ्याने जावे लागत होते. याला वाहतूकदारांना विरोध दर्शविल्याने उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण न करता रात्रीला अवजड वाहनांना परवानगी देण्यात आली. विकास कामे निर्धारित कालावधीत पूर्ण होत नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.
संस्था एकमेकांना धरताहेत दोषी
रेल्वे स्टेशन रोड, वर्धा रोड, नरेंद नगर पूल, मनीष नगर पूल, लोहा पूल यासह अनेक ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांत विविध संस्थांचा समावेश आहे. यासाठी संस्था एकमेकांना दोषी धरत आहेत. किंग्सवे रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हा रस्ता मनपाच्या मालकीचा आहे. या ठिकाणी अपघाताचा धोका आहे. महामार्ग रस्त्याची दुरुस्ती मनपाला करण्यास सांगत आहे. यामुळे हा रस्ता अडचणीचा ठरत आहे. गुरुवारी रात्री पोलिसांनी कंत्राटदाराला तंबी देत श्रीमोहीनी चौकात साचलेले पाणी काढण्यास बाध्य केले.
.......