ऊन तापलं, फुलं कोमेजली, सजावट महागली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 08:58 PM2022-05-07T20:58:36+5:302022-05-07T21:00:36+5:30
Nagpur News वाढत्या उन्हामुळे फुले कोमेजली आहेत आणि ५० टक्क्यांनी महागली आहेत. परिणामी, सजावटीचा खर्च वाढला आहे.
नागपूर : लग्न म्हटलं की सजावट आलीच. त्यासाठी मागणी असते वेगवेगळ्या फुलांना. मनाप्रमाणे स्टेज, हॉल वा लॉनची थीम साकारण्यासाठी सजावटीच्या फुलांची क्रेझ वाढत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे फुले कोमेजली आहेत आणि ५० टक्क्यांनी महागली आहेत. परिणामी, सजावटीचा खर्च वाढला आहे.
लग्नात स्टेज केंद्रस्थानी असतो. सजावटीच्या निमित्ताने कायमस्वरूपी आठवणी याप्रसंगी तयार केल्या जातात; पण यंदा सजावटीची फुले महाग झाल्यामुळे अनेकांना सजावटीसाठी काटकसर करावी लागत आहे. यंदा तापमान वाढल्यामुळे फुलांच्या उत्पादनांवर परिणाम झाला आहे. तापत्या उन्हामुळे फुले टिकत नाहीत वा टवटवीत राहत नसल्याने शेतकऱ्यांना चिंता आहे. पॉलिहाऊसमध्ये उत्पादन कमी झाल्यामुळे सर्वच फुलांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे मत आहे.
फुलांना उन्हाळ्यातच जास्त मागणी
कटफ्लॉवर अर्थात सजावटीच्या फुलांना उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारे जरबेरा, डच गुलाब, कार्नेशन, आर्किड, लिलियममध्ये आशियाटिक, ओरिएन्टल, जिप्सोफिलिया, गोल्डन रॉड, ग्लॅडिओलस या फुलांना उन्हाळ्यात जास्त मागणी असते. ही फुले स्थानिक उत्पादकांसह बेंगळुरू, मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात नागपुरातील फुलांची मुख्य बाजारपेठ सीताबर्डी नेताजी फूल मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहेत. लग्नाच्या सीझनमध्ये सजावटीच्या फुलांची मागणी वाढते ही बाब खरी असली, तरीही फुलांचे भाव अतोनात वाढल्यामुळे लग्नकार्यासाठी अनेक विक्रेते नोंदणी करूनच फुलांची मागणी करीत असल्याची माहिती नेताजी फूल मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी दिली.
दररोज २० लाखांची उलाढाल
उन्हाळ्यात सजावटीच्या फुलांची उलाढाल २० लाखांपेक्षा जास्त होते. या दिवसात लग्नकार्यात सजावट करणारे आधीच ऑर्डर देतात. त्यानुसार बेंगळुरू, मुंबई आणि पुणे येथून फुले मागवावी लागतात. सध्या कृत्रिमऐवजी खऱ्या फुलांनी सजावट करण्याची क्रेझ वाढत असल्यामुळे व्यवसायात वाढ झाल्याचे रणनवरे यांनी सांगितले.
स्थानिकांसह बेंगळुरू, मुंबई, पुणे येथून आवक
नागपुरातील फुलांची मुख्य बाजारपेठ सीताबर्डी नेताजी मार्केटमध्ये नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बेंगळुरू, मुंबई, पुंणे येथून पूजेची आणि सजावटीच्या फुलांची आवक होते. राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये भावासंदर्भात अस्थिरता असल्यास सांगली, सातारा, संगमनेर, अहमदनगर, हैदराबाद, अमरावती, अकोला, छिंदवाडा या भागातूनही फुले विक्रीसाठी येतात. तसेच पॉलिहाऊसमधून सजावटीची फुले उत्पादक आणतात.