राॅयल्टीच्या कमतरतेमुळे ‘डब्ल्यूआर’ रेती वाहतुकीला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 11:48 AM2023-06-02T11:48:21+5:302023-06-02T11:48:30+5:30
ब्रह्मपुरी, नागभीड रेतीपुरवठ्याचे केंद्र : महसूल व पाेलिस विभागाची मूकसंमती
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड व पवनी (जिल्हा भंडारा) येथील घाटमालकांकडील राॅयल्टी संपत आल्याने या ठिकाणांहून राेज माेठ्या प्रमाणात विना राॅयल्टी (डब्ल्यूआर) व ओव्हरलाेड रेती नागपूर शहरात आणली जात आहे. यात राज्य सरकारचा महसूल बुडत असला तरी या तिन्ही जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या महसूल व पाेलिस विभागातील अधिकाऱ्यांची या रेती तस्करी मूकसंमती असल्याची माहिती याच विभागातील कर्मचाऱ्यांनी खासगीत दिली.
ब्रह्मपुरी, नागभीड व पवनी या तिन्ही ठिकाणांहून नागपूर शहरात राेज किमान ३०० टिप्पर रेती घेऊन येतात. हे टिप्पर ब्रह्मपुरी, कांपा, नागभीड, भिवापूर, उमरेड तसेच नागभीड, सिंदेवाही, कांपा, भिवापूर, उमरेड आणि पवनी, भिवापूर, उमरेड मार्गे नागपूर शहरात दाखल हाेतात. त्यातील किमान २०० टिप्पर विना राॅयल्टी व ओव्हरलाेड असतात. मुळात चंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाटमालकांकडील राॅयल्टी संपत आल्या आहेत. त्यामुळे डब्ल्यूआर साेबत ओव्हरलाेड रेती वाहतूक केली जात आहे, असे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
‘सुपर एन्ट्री’चा प्रताप
चंद्रपूर जिल्ह्यातील घाटमालक प्रत्येक टिप्पर मालकाकडून प्रति ट्रीप एक हजार रुपये घेतात. त्यातून गाेळा झालेली रक्कम ते ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यातील महसूल व पाेलिस विभागातील अधिकाऱ्यांना देतात. त्याला रेती तस्कर ‘सुपर एन्ट्री’ संबाेधतात. ‘सुपर एन्ट्री’मुळे चंद्रपूर जिल्ह्यात या टिप्परवर कुठलीही कारवाई केली जात नाही.
‘ट्रेडिंग लायसन्स’वर रेती चाेरी
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या काही कारवाईमध्ये रेतीसाठा जप्त केला. महसूल विभागाने या साठ्याचा लिलाव करून संबंधितांना ‘ट्रेडिंग लायसन्स’ दिले. ‘ट्रेडिंग लायसन्स’धारकांनी साठ्यातील रेतीची कमी आणि नदीच्या पात्रातील रेतीचा अवैध उपसा करून ती विकण्याचा सपाटा लावला. हा प्रकार महसूल विभागातील अधिकाऱ्यांना माहिती असूनही कारवाई केली जात नाही.
‘ओव्हरलाेड’ वाहतूक
१० चाकांच्या टिप्परमध्ये चार ब्रास रेती वाहतुकीची परवानगी असताना त्यात किमान सहा ब्रास तर १२ चाकांच्या टिप्परमध्ये सहा बास रेती वाहतुकीची परवानगी असताना त्यात किमान नऊ ब्रास रेतीची वाहतूक केली जाते. हा प्रकार चंद्रपूर, भंडारा व नागपूर जिल्ह्यातील जिल्हा वाहतूक शाखा ठाण्यांमधील वाहतूक पाेलिसांना माहिती असूनही कारवाई केली जात नाही.
नागपूर जिल्ह्यात वेगळी ‘एन्ट्री’
रेती वाहतुकीचे टिप्पर नागपूर जिल्ह्यात दाखल हाेताच त्यांना भिवापूर व उमरेड महसूल व पाेलिस विभागाला वेगळी एन्ट्री द्यावी लागते. ही एन्ट्री खासगी माणसांकडून वसूल केली जाते. पवनी (जिल्हा भंडारा) डेपाेतील रेतीदेखील डब्ल्यूआर व ओव्हरलाेड असते. हा प्रकार सर्वांना माहिती असल्याचे महसूल व पाेलिस विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.