'लोकमत'मुळे रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकाच्या गेटवर तिकीट तपासणारे हजर

By नरेश डोंगरे | Published: July 21, 2023 10:44 PM2023-07-21T22:44:18+5:302023-07-21T22:44:53+5:30

अधिकाऱ्यांकडून झाली झाडाझडती : कर्तव्य कसुरीला माफी नसल्याचा इशारा.

due to lokmat ticket checkers are present at the gate of the railway station at night | 'लोकमत'मुळे रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकाच्या गेटवर तिकीट तपासणारे हजर

'लोकमत'मुळे रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकाच्या गेटवर तिकीट तपासणारे हजर

googlenewsNext

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असलेल्या नागपूररेल्वे स्थानकावरील काही गेटवर तिकीट तपासणारी मंडळी हजर राहत नसल्याचे वृत्त लोकमतने शुक्रवारी ठळकपणे प्रकाशित करताच संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांत एकच खळबळ निर्माण झाली. नागपूरच नव्हे तर मुंबईपर्यंत लोकमतच्या वृत्ताची कटिंग पोहचल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, संबंधितांची दिवसभर झाडाझडती झाली. त्यानंतर आज रात्री चेकिंग स्टाफ आपले कर्तव्य बजावताना दिसून आला.

मध्य भारतातील महत्त्वाचे आणि मोठे रेल्वे स्थानक म्हणून देशात ओळखल्या जाणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या सर्व भागात रेल्वेगाड्या जात येत असतात. त्यामुळे २४ तास या स्थानकावर गाडी आणि प्रवाशांची ये - जा सुरू असते. विशेष म्हणजे, या रेल्वे स्थानकाला यापूर्वी उडवून देण्याची धमकी दहशतवादी संघटनांनी दिली असून, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून नेहमी सतर्क राहण्याचे ईशारे दिले जातात. घातपाताच्या धोक्याचा हा एक भाग असला तरी दुसरा भाग चोर, भामट्यांचा, समाजकंटकांचा आहे. रोज हजारोंच्या संख्येत येथून प्रवासी येणे-जाणे करीत असल्यामुळे चोर, भामटेही येथे नेहमीच येथे सक्रिय असतात. संधी मिळताच ते हात मारतात.

तिसरे म्हणजे, नागपुरात मोठ्या प्रमाणावर विविध भागातून अमली पदार्थ आणला जातो. येथून तो विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेशमध्येही पोहचविण्यात येतो. असे सर्व असताना रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या गेटवर चेकिंग स्टाफच दिसत नाही. हा प्रकार लोकमतने शुक्रवारी उघड केल्यानंतर संबंधितांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली. दरम्यान, लोकमतच्या वृत्ताचे कटिंग सर्वत्र व्हायरल झाले. त्याची दखल मुंबई आणि नागपूरच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली. वरिष्ठ अधिकारी आशुतोष श्रीवास्तव यांनी संबंधित चेकिंग स्टाफमधील अनेकांना आज दिवसभर बोलवून या प्रकाराबाबत जाब विचारला. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यापुढे अशा प्रकारे कर्तव्यात कसुरी सहन केली जाणार नसल्याचे खडे बोल त्यांनी संबंधितांना सुुनावले. मुंबईहूनही स्थानिक अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा झाली. त्यामुळे आज रात्री बाहेरच्या गेटवर महिला टीसीसह चेकिंग स्टाफ कर्तव्य बजावताना दिसून आला.

दिल्लीतही तक्रार

प्रवाशांची सुरक्षा धोक्यात घालू पाहणाऱ्या या गंभीर प्रकाराची तक्रार प्रवासी यात्री संघाचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वे बोर्डाच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांकडेही केली आहे. लठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावावे, अशी मागणीही त्यांनी वरिष्ठांना पाठविलेल्या तक्रारवजा निवेदनातून केली आहे.

Web Title: due to lokmat ticket checkers are present at the gate of the railway station at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.