प्रज्वल रेवण्णा 'सेक्स कांडा'मुळे अनेक सेक्स स्कॅण्डलची चर्चा
By नरेश डोंगरे | Published: May 2, 2024 07:52 PM2024-05-02T19:52:52+5:302024-05-02T19:53:51+5:30
लोकमत स्पेशल: या पार्श्वभूमीवर, देश-विदेशात गाजलेले आणि राजकीय कनेक्शन असलेले यापूर्वीचेही असेच अनेक 'सेक्स कांड' आता चर्चेला आले आहे.
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या, विशेषत: राजकीय वर्तुळाला हादरवणाऱ्या कर्नाटकमधील प्रज्वल रेवण्णाच्या सेक्स कांडाने सर्वत्र चर्चेचे रान पेटवले आहे. या पार्श्वभूमीवर, देश-विदेशात गाजलेले आणि राजकीय कनेक्शन असलेले यापूर्वीचेही असेच अनेक 'सेक्स कांड' आता चर्चेला आले आहे.
प्रज्वल रेवण्णा हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगाैडा यांचे नातू होय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडाला असताना हे सेक्स कांड चर्चेला आले. त्यामुळे निवडणूकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांना आंबटगोड फोडणी मिळाली आहे. विशेष म्हणजे, सर्व सामान्यांना समाजसेवेचे धडे देणाऱ्या राजकीय नेत्यांचे लैंगिक शोषणाचे हे काही पहिले प्रकरण नव्हे. अशा प्रकारे यापूर्वी अनेक नेत्यांचे असेच लज्जास्पद कांड चर्चेला आले आहेत.
काँग्रेसशी संबंधित एका नेत्याची सिडी काही वर्षांपूर्वी अशीच चर्चेला आली होती. वेगात फिरणाऱ्या या सिडीतील दृश्य बघता दिल्ली हायकोर्टाने या सिडीच्या प्रसारणावर बंदी घातली होती.
मधुमिता आणि अमरमणी अनैतिक प्रकरणाचा भडका उडाल्यानंतर तत्कालीन मंत्री अमरमणी यांच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले होते. त्यामुळे २००३ मध्ये मधुमिताची हत्या करण्यात आली होती. २००६ मध्ये श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) पोलिसांनी एका शबिना नामक महिलेला अटक केली होती. त्यावेळी तिच्या चाैकशीतून असे काही धक्कादायक खुलासे झाले की, अनेक मंत्री आणि नेत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कारागृहात जावे लागले होते.
२००७ मध्ये फैजाबाद (उत्तर प्रदेश) मधील शशी आणि आनंद सेन यांच्या प्रकरणाने देशाच्या राजकारणात खळबळ निर्माण केली होती. या प्रकरणातही नंतर अनैतिक संबंधाचा बोभाटा होऊ नये म्हणून शशीची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले होते. राजस्थानमधील भवरी आणि महिपाल प्रकरणाने तर सरकारला मान खाली घालण्याची स्थिती निर्माण केली होती. हे प्रकरण तेव्हा प्रचंड गाजले आणि राजकारण तसेच अतिमहत्त्वाकांक्षेची भवरी बळी ठरल्याचे भवरी हत्याकांडानंतर उघड झाले होते. महिपाल मदेरणा या माजी मंत्र्याची या प्रकरणामुळे कारागृहात 'चक्की पिसिंग'साठी रवानगी झाली होती.
अनेकांची बोलती बंद झाली होती
आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल आणि एका वयोवृद्ध काँग्रेस नेत्याचे प्रकरणाने, भोपाळच्या एका मोठ्या नेत्याशी संबंधित आरटीआय ॲक्टिविस्ट शेहला मसूदच्या प्रकरणानेही राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण केली होती. तर, काही महिन्यांपूर्वी एका मराठी न्यूज चॅनलने एका भाजपा नेत्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करून खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणांनी अनेकांची बोलती बंद केली होती.