सद्गुरूंमुळे लोकमत व जीवनविद्या मिशनचे विश्वशांतीसाठी एकमत: प्रल्हाद पै 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 09:30 AM2023-10-23T09:30:22+5:302023-10-23T09:31:22+5:30

जपयज्ञ सोहळ्यात लोकमत कालदर्शिकेचे प्रकाशन

due to sadguru lokmat and jeevanvidya mission unanimity for world peace said pralhad pai | सद्गुरूंमुळे लोकमत व जीवनविद्या मिशनचे विश्वशांतीसाठी एकमत: प्रल्हाद पै 

सद्गुरूंमुळे लोकमत व जीवनविद्या मिशनचे विश्वशांतीसाठी एकमत: प्रल्हाद पै 

लोकमत न्यूज  नेटवर्क, नागपूर : सद्गुरू वामनराव पै आपल्या प्रवचनात म्हणायचे की, कुठलीही अपेक्षा न धरता लोकमत निरपेक्षपणे आपले विचार प्रखरतेने मांडत आला आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा वसा ‘लोकमत’ने अखंडपणे जपला आहे.  

जीवनविद्येला याचमुळे सतत ‘लोकमत’चा मंच मिळाला, असे गौरवोद्गार जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै यांनी शनिवारी येथे काढले. डॉ. विजय दर्डा हे जीवनविद्या परिवारातील असून, सद्गुरुंमुळे लोकमत आणि जीवनविद्येचे विश्वशांतीच्या मुद्द्यावर एकमत असल्याची भावना प्रल्हाद पै यांनी व्यक्त केली. 

जीवनविद्या मिशनतर्फे सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्वशांती जपयज्ञाचे आयोजन नागपुरात करण्यात आले होते. यावेळी लोकमत कालदर्शिकेचे प्रकाशन प्रल्हाद पै यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा उपस्थित होते. 

याप्रसंगी प्रल्हाद पै यांच्या हस्ते डॉ. विजय दर्डा यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. दर्डा  म्हणाले की, प्रत्येकाचे स्वत:चे विश्व असते. तेव्हा विश्वात चांगले घडविण्यात व्यक्तीची जबाबदारी, कर्तव्य काय याची जाणीव सद्गुरू वामनराव पै यांनी पेरली. राष्ट्र घडविण्यासाठी आधी स्वत:ला घडविले पाहिजे, यासाठी त्यांनी प्रत्येकाला प्रेरित केले. जीवनविद्या मिशन तत्त्वज्ञान व्यक्ती व राष्ट्र बळकट करणारे आहे.

सदगुरूंचा मंत्र जीवनाला ऊर्जा देणारा : डॉ. दर्डा

संकटावेळी एकटे पडल्यावर नैराश्य येते, अशा वेळी पाठीवर कुणाचा तरी हात असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या मंत्राने अशा निराश झालेल्या कित्येकांच्या जीवनात ऊर्जेचा स्त्रोत फुलविला आहे. त्यांच्या क्षमतेचा पुन्हा परिचय करून दिला, असे मत डॉ. विजय दर्डा यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

लोकमत कालदर्शिकेत सदगुरूंच्या कार्याची माहिती

लोकमत कालदर्शिकेबद्दल बोलताना प्रल्हाद पै म्हणाले की, कालदर्शिकेत सद्गुरुंच्या जीवनचरित्राचे दर्शन, सद्गुरुंच्या कार्याची माहिती आहे व लेखही आहेत. सर्वांनी जरूर वाचावे. याप्रसंगी सांगलीचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांनी लिहिलेल्या ‘दृष्टिक्षेप’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.  डॉ. पटवर्धन यांचे सद्गुरुंच्या सानिध्यात जीवन कसे बदलले  याचे अनुभव पुस्तकातून मांडले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. माधवी दिलीप पटवर्धन यादेखील उपस्थित होत्या.

 

Web Title: due to sadguru lokmat and jeevanvidya mission unanimity for world peace said pralhad pai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.