उन्हाचा तडाखा अन् रेड सिग्नलमुळे दुचाकी चालकांना उष्माघाताचा धोका
By नरेश डोंगरे | Published: April 20, 2023 02:47 PM2023-04-20T14:47:38+5:302023-04-20T14:48:24+5:30
दुचाकीचालकांसह रिक्षा ओढणाऱ्यांचे उन्हामुळे हाल : सिग्नलवर ग्रीन नेटची प्रतिक्षा
नागपूर :नागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. अशात भर दुपारी 'रेड सिग्नल'मुळे दुचाकीचालक, सायकल रिक्षा ओढणाऱ्यांना सिग्नलवर उभे राहावे लागत आहे. शहरातील सिग्नलवर अद्याप 'ग्रीन नेट'ची व्यवस्था न झाल्यामुळे उन्हाच्या तडाख्याने दुचाकीचालक तसेच सायकल रिक्षा ओढणारांना उष्माघाताचा धोका होण्याचीही भीती निर्माण झाली आहे.
नागपूर - विदर्भातील उन्हाळा अग्निपरिक्षेपेक्षा कमी नसतो. एप्रिल-मे मध्ये उन्हाचा पारा ४७ - ४८ डिग्रीच्या पुढे जातो. उन्हाची तीव्रता लक्षात घेता अनेक जण सकाळी बाहेर पडून काम आटोपतात आणि दुपारी १२ च्या आत घरात परततात. अनेक जण थेट सायंकाळी ६ नंतरच घराबाहेर पडणे पसंत करतात. मात्र, रोजच्या रोजी-रोटीचा सवाल असलेले लाखो जण भर उन्हातच रोजगार आणि वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहतात. तीव्र उन्हात त्यांची ईकडून तिकडे धावपळ सुरू असते. यातील बहुतांश मंडळी दुचाकीने जात-येत असतात.
शहरातील वाहतूक व्यवस्था संचलित करणारे बहुतांश मोठ्या चाैकातील आणि गजबजलेल्या भागातील स्वयंचलित सिग्नल सुरूच असल्याने दुचाकी चालकांना रेड सिग्नलमुळे सिग्नलवर उभे राहावे लागते. त्यामुळे दुचाकीवरील मंडळींना उन्हाचा तडाखा बसतो. आपल्या छोट्या मुलांना किंवा आजारी असलेल्या नातेवाईकांना दुचाकीवर घेऊन जाणाऱ्या व्यक्तींचे सर्वाधिक हाल होतात. सायकल रिक्षा आणि मालवाहू सायकलरिक्षा ओढणाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. उन्हामुळे त्यांना उष्माघात होण्याचा आणि त्याच्या जिविताचाही धोका वाढतो.
कुठे आहेत सेवाभावी व्यक्ती, स्वयंसेवी संस्था ?
विशेष म्हणजे, शहरातील काही सेवाभावी व्यक्ती, प्रतिष्ठान आणि स्वयंसेवी संस्था उन्हाळ्यात दरवर्षी गजबजलेल्या भागातील तसेच मोठ्या वर्दळीच्या मार्गावरील सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या वर चारही बाजूंनी ग्रीन नेट लावायचे. त्यामुळे सिग्नलवर सावली निर्माण होत असल्याने त्याखाली उभे राहणाऱ्या दुचाकीचालकांना तीव्र उन्हापासून संरक्षण मिळायचे. आता मात्र एप्रिल महिन्याची २० तारिख झाली तरी अद्याप कुण्या चाैकातील सिग्नलवर ग्रीन नेट लावण्यासाठी कुणी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे दुचाकीचालकांचे, सायकल रिक्षा ओढणारांचे हाल होत आहे.
ट्रॅफिक विभागाकडूनही पुढाकार नाही
एप्रिल- मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दुचाकीचालकांचे हाल होऊ नये म्हणून वर्दळीच्या मार्गातील चाैकावरचे सिग्नल दुपारी २ ते ५ च्या दरम्यान बंद ठेवण्याचा (वाहतूक बिनदिक्कत सुरू ठेवण्याचा) प्रयोग याआधी शहरात झाला आहे. यंदा तशी काही व्यवस्था झालेली नाही किंवा दुचाकी चालकांचे, सायकल रिक्षा चालकांचे प्रखर उन्हामुळे होणारे हाल रोखण्यासाठी वाहतूक शाखा पोलिसांकडून अद्याप पुढाकार घेण्यात आलेला नाही.