कळमन्यात सुरक्षेमुळे धान्य व्यापाऱ्यांची दुकाने उघडली नाही, स्ट्राँग रूममध्ये इव्हीएम मशीन्स
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 20, 2024 09:08 PM2024-04-20T21:08:37+5:302024-04-20T21:08:57+5:30
असुविधेचा व्यापारी, ग्राहक आणि अडतियांना त्रास सहन करावा लागला. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या न्यू ग्रेन मार्केट परिसरातील काही दुकाने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणांनी सकाळी बंद ठेवली. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. शिवाय परिसरातून वाहने बाहेर काढण्यासाठी लोकांना कसरत करावी लागली. असुविधेचा व्यापारी, ग्राहक आणि अडतियांना त्रास सहन करावा लागला. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही प्रशासनाला सहकार्य करीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीत उपयोगात आलेल्या सीलबंद इव्हीएम मशीन्स सुरक्षेत ठेवण्यासाठी कळमना कृषी उत्पन्न समितीच्या न्यू ग्रेन मार्केट परिसरात स्ट्राँग रूम तयार करण्यात आली आहे. स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी मतदान झाले. शनिवार सकाळपासूनच सीलबंद इव्हीएम मशीन्स बंदोबस्तात कळमन्यात येणे सुरू झाले. सुरक्षेसाठी आजूबाजूला परिसर बंद करण्यात आला.
स्ट्राँग रूमच्या बाजूला असलेली न्यू ग्रेन मार्केटमधील जवळपास १५ दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आणि दुकाने सुरू करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालत सुरक्षेच्या कारणांनी केवळ काहीच तासासाठी दुकाने बंद करण्यात आल्याचे सांगितले. अखेर सायंकाळी ५ च्या सुमारास दुकाने सुरू झाली. त्यानंतर व्यवसाय पूर्ववत सुरू झाला. रविवारी न्यू ग्रेन मार्केट बंद असते. त्यामुळे दुकाने उघडण्याचा प्रश्नच नाही. सोमवारी नेहमीप्रमाणे दुकाने सुरू राहतील, असे अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्यात अटीवर सांगितले.
सर्व बाजारपेठा सुरू
शनिवारी भाजीपाला, फळ, धान्य बाजारपेठा सुरू होत्या. त्यामुळे रात्रीपासूनच माल ट्रकमध्ये येण्यास सुरुवात झाली. सकाळी १० च्या आत माल खाली केलेले ट्रक गेटबाहेर गेले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणांनी सर्वांना अडविण्यात आले. अखेर इव्हीएम मशीन्स स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित पोहोचल्याची खातरजमा केल्यानंतर वाहने गेटबाहेर नेण्यास परवानगी देण्यात आली. हा शनिवारी केवळ काही तासाचा प्रश्न होता, असे अधिकारी म्हणाले.
दुकाने बंद होण्याची माहिती नव्हती
स्ट्राँग रूम न्यू ग्रेन मार्केटमध्ये बनविण्यात आली आहे. इव्हीएम मशीन्स स्ट्राँग रूममध्ये आणताना लगतची दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष होता. शिवाय बाहेरून आलेल्या ग्राहकांनी संताप व्यक्त केला. मशीन्स स्ट्राँग रूममध्ये ठेवल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास दुकाने सुरू झाली. याची कल्पना अधिकाऱ्यांनी आधी द्यायला हवी होती.
रमेश उमाटे, व्यापारी, न्यू ग्रेन मार्केट.
धान्य खरेदी न करताच परतलो
कळमन्यात स्ट्राँग रूमच्या आजूबाजूला पोलिसांचा कडकोट बंदोबस्त असून अखेर धान्य खरेदी न करता घरी परतलो. सकाळी १२ च्या सुमारास धान्य बाजारात खरेदीसाठी गेलो, असता पोलिसांनी बाहेर अडविले. तेव्हा वाहतुकीची कोंडी झाली होती. त्या कोंडीत फसल्यामुळे एक तास कार अडकून होते. संबंधित दुकान बंद असल्याने खरेदीविना घरी परतलो.
संजय खानोरकर, ग्राहक.