ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टममुळे नागपूर ते दुर्गदरम्यान १३० च्या स्पीडने धावली ट्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 09:32 PM2023-06-12T21:32:25+5:302023-06-12T21:32:53+5:30
Nagpur News दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कळमना ते दुर्ग या २६५ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे नागपूर ते दुर्ग मार्गावर रेल्वेगाडी प्रतितास १३०च्या स्पीडने धावली आहे.
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कळमना ते दुर्ग या २६५ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे नागपूर ते दुर्ग मार्गावर रेल्वेगाडी प्रतितास १३०च्या स्पीडने धावली आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्रातील कळमना (नागपूर) ते दुर्ग, जयरामनगर ते बिलासपूर ते बिल्हा (३२ किलोमीटर) आणि बिलासपूर ते घुटकू (१६ किलोमीटर) या एकूण ३१३ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर ऑटो सिग्नलिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. साधारणत: दोन रेल्वे स्थानकांमध्ये १२ ते १५ किलोमीटरचे अंतर असते. ही प्रणाली सुरू होण्यापूर्वी दोन रेल्वे स्थानकांच्या मध्ये एकच ट्रेन चालविली जात होती. त्यामुळे पहिली ट्रेन त्या स्थानकाला पार करत नाही तोपर्यंत दुसरी ट्रेन मागच्या स्थानकावर रेंगाळत होती. आता मात्र तसे होणार नाही. दोन रेल्वे स्थानकांच्या मध्ये ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टममुळे दोन, तीन किंवा चारही ट्रेन एकामागोमाग सुरक्षित अंतराने धावू शकतात. पुढच्या सिग्नलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर मागच्या ट्रेनला ऑटोमॅटिक सूचना मिळेल आणि त्यामुळे ती जागीच थांबविली जाईल. या प्रणालीमुळे ट्रेन विलंबाने धावण्याचा, रेंगाळण्याचा प्रकार कमी होऊन ट्रेनची गती जास्तीत जास्त वाढविण्यास मदत होईल. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर ते दुर्गपर्यंतची सेक्शनल स्पीड वाढवून राजधानी एक्स्प्रेसच्या समकक्ष ती १३० प्रतितास वेगाने चालविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, असा दावा रेल्वे प्रशासन करीत आहे.
जास्त देखभालीची गरज नाही
या संबंधाने रेल्वे प्रशासनाने आज दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, ऑटो सिग्नलिंग प्रणालीसाठी कुठले अतिरिक्त स्थानक निर्माण करण्याची किंवा जास्तीच्या देखभालीचीही गरज नाही. विनाकारण ट्रेन रेंगाळण्याच्या प्रकाराला या प्रणालीमुळे ब्रेक बसणार असल्याचे यात नमूद आहे.
----