भाजप पदाधिकाऱ्यांच्या ‘ना’राजीमुळे गाणारांचे ‘गो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2023 08:15 AM2023-02-03T08:15:00+5:302023-02-03T08:15:02+5:30
Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात पदवीधरनंतर शिक्षक मतदारसंघातदेखील भाजपला धक्का बसल्याने मनपा निवडणुकांच्या तोंडावर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
योगेश पांडे
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांच्या हॅट्ट्रिकचे स्वप्न भंगले आणि भाजपमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याचे दिसून आले. अनेक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट विरोध दर्शविला असतानादेखील नागो गाणार यांना पाठिंबा देण्यात आला अन् भाजपच्या गोटातील खदखद मतपेटीतील नाराजीच्या माध्यमातून प्रकर्षाने बाहेर आली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात पदवीधरनंतर शिक्षक मतदारसंघातदेखील भाजपला धक्का बसल्याने मनपा निवडणुकांच्या तोंडावर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपमधून काहीजण आग्रही होते. विशेषतः विद्यापीठ वर्तुळात सक्रिय असणाऱ्या पदाधिकाऱ्याला तर यंदा उमेदवारी मिळेलच अशी खात्री होती. मागील दोन वर्षांपासून ‘नेटवर्किंग’ सुरू झाले होते. याशिवाय प्रदेश पातळीवर उपाध्यक्ष असलेल्या पदाधिकाऱ्यानेदेखील वरिष्ठांकडे शब्द टाकला होता. मात्र सर्वेक्षण अहवालांवर विसंबून राहणाऱ्या भाजपने नवीन उमेदवार दिला तर फटका पडेल या निष्कर्षावर विश्वास ठेवला. उमेदवारीसंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर अनेकांनी भाजपने यंदा उमेदवार उतरवावा अशीच भूमिका मांडली. मात्र अखेरच्या क्षणी शिक्षक परिषदेच्या गाणार यांच्यावरच विश्वास दाखविण्यात आला. यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. प्रचारादरम्यानदेखील ती बाब प्रकर्षाने जाणवली. काही इच्छुकांनी तर उघडपणे नाराजी बोलून दाखविली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या काही शिक्षक संघटनांनी तर ऐनवेळी अडबाले यांना समर्थन जाहीर केले होते. त्याचेच प्रतिबिंब मतदानात उमटल्याचे दिसून आले.
पदाधिकाऱ्यांनादेखील धक्का; आत्मचिंतनावर भर राहणार
मनपा निवडणुकांच्या तोंडावर गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अशा प्रकारे सलग दुसरा पराभव झाल्याने पदाधिकाऱ्यांनादेखील धक्का बसला आहे. ‘मायक्रो’ नियोजनावर भर देण्यात येत असताना गाणारांच्या प्रचारात नेमकी काय गडबड झाली याची कारणमीमांसा सुरू झाली आहे. भाजपकडून यासंदर्भात तातडीने आत्मचिंतन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहराध्यक्षांचा दावा, कुणीही नाराज नाही
अंतर्गत नाराजीचा फटका बसल्याचे स्पष्टपणे दिसून येत असताना भाजपकडून आलबेल असल्याचेच दावे करण्यात येत आहे. हा पराभव धक्कादायक असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रचार केला. मात्र यश आले नाही हे सत्य आहे. शिक्षकांचा विश्वास जिंकण्यात का अपयश आले व नेमके कुठे कमी पडलो याची कारणे शोधण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत उमेदवारी मिळावी ही काही जणांची इच्छा होती व त्यात गैर काहीही नाही. मात्र गाणारांना पाठिंबा जाहीर झाल्यावर सर्वांनी एकदिलाने प्रचार केला, असा दावा त्यांनी केला.