तरुणीच्या अश्लील डान्समुळे रेल्वेतील सामाजिक आंचारसंहितेवरच प्रश्नचिन्ह
By नरेश डोंगरे | Published: February 26, 2024 10:41 PM2024-02-26T22:41:21+5:302024-02-26T22:41:34+5:30
सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, रेल्वेच्या दाव्यांची पोलखोल
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एका तरुणीने ट्रेनमध्ये अश्लिल डान्स करण्याच्या खळबळजनक प्रकारानंतर रेल्वे गाड्यांमधील सुरक्षिततेचा आणि नैतिकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रविवारी सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या खळबळजनक व्हिडीओमुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. रेल्वेच्या डब्यात खरेच सुरक्षित वातावरण राहते का, असा प्रश्नही विचारला जात आहे.
धावत्या ट्रेनमध्ये स्टंटबाजी करून फेसबूक लाईव्ह करण्याचा किंवा व्हिडीओ बनविण्याचा आणि तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याचा ट्रेंड मध्यंतरी जोरात होता. सवंग प्रसिद्धीसाठी काही जण बर्थ डे सेलिब्रेशन, ग्रुप डान्स, कलाबाजी किंवा असेच प्रकार ट्रेनच्या कोचमध्ये करतात. लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीने अश्लितेचा कळस गाठत अश्लिल डान्स केला आणि रेल्वेतील सामाजिक आंचार संहितेवरच प्रश्नचिन्ह लावले. महिला-पुरूषांनी भरलेल्या लोकलच्या पॉश डब्यात बसलेली अर्धवट काळे कपडे घातलेली ही तरुणी अचानक उठून उभी झाली आणि तिने डान्स सुरू केला. डान्स करतानाची तिची ती अश्लिलता बघून अनेक महिला आपल्या जागेवरून बाजुला झाल्या. तर, तिच्या शेजारच्या सिटवर बसलेल्या युवतीने लज्जेखातर आपली बॅग तोंडासमोर धरून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओत दिसून येते. अवघ्या २० सेकंदाचा हा संतापजनक व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे. तो 'अॅट देसी मोजिटो' नामक अकाउंटवरून शेअर करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून मोठमोठे दावे केले जाते. समाजकंटकांकडून त्रास होऊ नये किंवा कसला अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोचमध्ये गार्ड तैनात केले जात असल्याचेही सांगण्यात येते. मात्र, या व्हिडीओने रेल्वेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे.
----
नागपुरात झाला होता गुन्हा दाखल
या व्हिडीओमुळे रेल्वेतील प्रवाशासंदर्भातील आचार संहिता पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. रेल्वे स्थानक, फलाट अथवा रेल्वेगाडीत अशा प्रकारचे कृत्य करण्यास प्रतिबंध आहे. रेल्वेच्या अधिनियमाप्रमाणे संबंधित व्यक्तीवर गुन्हाही दाखल होतो. नागपुरात दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे काही तृतियपंथियांनी मेट्रो ट्रेनमध्ये अश्लिल डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी मेट्रोकडून तक्रार दिल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
------