नागपुरात मुसळधार पावसामुळे वस्त्या जलमय, युवक नाल्यात वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 09:25 PM2020-08-03T21:25:49+5:302020-08-03T23:56:23+5:30
सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. अनेक नागरिक झोपेत असताना घरात पाणी शिरल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले. अनेक नागरिक झोपेत असताना घरात पाणी शिरल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली. काही नागरिकांच्या घरगुती साहित्याचे नुकसान झाले. रस्त्यावरूनही पाण्याचे लोट वाहत असल्यामुळे सकाळी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. महापालिकेच्या अग्निशमन विभागात मदतीसाठी अनेक नागरिकांनी संपर्क साधला. तर मोमिनपुरा येथील एक युवक खैरी नाल्यात वाहून गेला.
पिपळा रोडवरील रस्ते पाण्याखाली
संतोषीनगर, धनगवळीनगर, दुबेनगर, मेहरबाबा धाम मंदिर या भागात रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागली. रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांची संख्या कमी झाली. अनेकांना भाजी विकण्यासाठी टेबलची व्यवस्था करावी लागली. पाण्याचे लोट पाहण्यासाठी वस्तीतील नागरिक रस्त्यावर आले होते. काही वाहनचालक पाण्यातून रस्ता काढत होते. तर अनेक वाहनचालक जोरात वाहन चालवून इतरांच्या अंगावर पाणी उडविण्यात धन्यता मानत होते. लहान मुले सायकल घेऊन रस्त्यावर फिरत होते.
म्हाळगीनगर परिसरात झोपड्यांमध्ये शिरले पाणी
म्हाळगीनगर परिसरात हुडकेश्वर रोडवरील राजापेठ, शिवाजी कॉलनी, आनंदनगर, शामनगर, सेंट पॉल शाळेच्या परिसरात पाणी साचले होते. या भागात अनेक मजूर राहतात. त्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे पहाटेपासून ते घरातील पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होते. अनेकांच्या घरातील साहित्य पाण्यात ओले झाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले. अनेकांच्या झोपड्यात पाणी शिरल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली.
सावरबांधे ले-आऊटमधील विहिरी भरल्या तुडुंब
सावरबांधे ले-आऊटमधील नाल्याला पूर आल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. नागरिकांच्या घरातील साहित्य यात बुडाले. पहाटे ४ वाजेपासून नागरिक घरातील पाणी बाहेर काढण्याच्या कामात लागले होते. काही जणांच्या विहिरी तुडुंब भरल्या. काही ठिकाणी शौचालयात पाणी जमा झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
मानेवाडा भागातही रस्त्यावर पाणी
मानेवाडा ते बेसा मार्गावर रस्त्यावर पाणी साचले होते. परिसरातील नाल्याला पूर आला होता. पाऊस सुरू असताना रस्त्यावर पाणी साचले. परंतु पाऊस कमी झाल्यानंतर रस्त्यावरील पाणी ओसरले. या रस्त्यावर अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जातात. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही.
मनीषनगर भागही पाण्यात
मनीषनगर ते बेलतरोडी मार्गावर सिमेंट रोडचे काम सुरू आहे. हा रस्ता एका बाजूने तयार झाला आहे. तर दुसºया बाजूने नाल्यासारखे पाणी वाहत होते. मनीषनगरच्या अनेक सोसायट्यांच्या रस्त्यावर खोलगट भाग असल्यामुळे पाणी साचले होते. त्यातून वाहनचालकांना वाहन चालवावे लागले. शनिधाम चौक, शिल्पा सोसायटी, सप्तगिरीनगर या भागातही रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अनेक रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचले होते.
सीताबाई घाटाचा रस्ता झाला बंद
मानेवाडा परिसरात सीताबाई घाट आहे. हा घाट नाल्याला लागून आहे. हा खोलगट भाग असल्यामुळे घाटावर जाण्याचा रस्ता बंद झाला. बराच वेळ पर्यंत या रस्त्यावर पाणी साचले होते. पाऊस बंद झाल्यानंतर या रस्त्यावरील पाणी ओसरले.
पारडी परिसर जलमय
मुसळधार पावसामुळे पारडी परिसरातील म्हाडा कॉलनी आणि दुर्गानगर भागात पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली. साचलेल्या पाण्यातून वाहन चालविताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली. पाऊस कमी झाल्यानंतर रस्त्यावरील आणि वस्तीतील पाणी ओसरले. तोपर्यंत नागनदी तुडुंब भरून वाहत होती.
नाल्याचे पाणी शिरले नागरिकांच्या घरात
प्रभाग क्रमांक ३६ मधील भेंडे ले-आऊट, शहाणे ले-आऊट, पाटील ले-आऊट, पन्नासे ले-आऊट या भागातील सांडपाण्याचा नाला ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे या भागातील दिलीप काळबांडे, भिवाजी राऊत, गायकवाड, चहांदे, जवादे आणि इतर नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले. भिवाजी राऊत यांच्या घरापासून ते रचना फ्लॅटपर्यंत मोठे पाईप टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे, लहुजी बेहते, वर्षा शामकुळे, लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. परंतु पाईप न टाकल्यामुळे नेहमीच नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरते. त्यामुळे नाल्याचे पाईप बदलविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
शाहूनगर भागात साचले गुडघाभर पाणी
बेसा मार्गावरील दीप कमल ले-आऊट, शाहूनगर भागात नागरिकांच्या घरासमोर सव्वा तीन फूट पाणी साचले होते. अनेक नागरिकांच्या हॉलमध्ये पावसाचे पाणी शिरले. नगरसेविका मंगला खेकरे यांनी जनरेटर लावून नागरिकांच्या घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ही वस्ती खोलगट भागात असल्यामुळे नागरिकांच्या घरात नेहमीच पाणी शिरते. त्यामुळे या भागातील रस्ता उंच करण्याची मागणी विलास कडू, धीरज गलगले आणि नागरिकांनी केली आहे.
नाल्याच्या पुरात युवक वाहून गेला
मुसळधार पावसामुळे कामठी-खैरी नाल्याला आलेल्या पुरात तारानगर येथे सकाळी ८ वाजेच्या सुमारास मोमिनपुरा येथील मोहम्मद वहीद (२३) हा युवक वाहून गेला. अग्निशमन विभागाच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला.
मोहम्मद वहीद हा काही कामानिमित्त खैरीकडे जात होता. नाल्याला पूर असल्याने मोहम्मद व अन्य दोघेजण नाल्याच्या काठावर उभे होते. मोहम्मदचा अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला व पुरात वाहून गेला. माहिती मिळताच अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. मोहम्मदचा शोध घेऊन त्याचा मृतदेह नाल्याच्या पुरातून बाहेर काढला.
चिखली - भरतनगर रोड पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे पूर्व नागपुरातील चिखली-भरतनगर रोड नाल्याला पूर आल्याने पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
सूर्यनगर वस्तीत साचले पाणी
पूर्व नागपुरातील कळमनालगतच्या सूर्यनगर वस्तीत पाणी साचल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. साचलेले पाणी काढण्यासाठी अग्निशमन विभागाच्या पथकाचे प्रयत्न सुरू होते.
अग्निशमन विभागाला २५ कॉल
मुसळधार पावसामुळे कळमना, चिखली, मानेवाडा सोनेगाव, खामला यासह शहराच्या विविध सखल भागात पाणी साचले होते. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते तर काही वस्त्यात लोकांच्या घरात पाणी शिरले. दोन तासात महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे मदतीसाठी पंचवीस कॉल आले होते. आवश्यक असलेल्या ठिकाणी विभागाकडून मदत व बचावकार्य करण्यात आले.