लसीकरण मृत्यू प्रकरणाचे आज कळणार कारण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:34 PM2018-12-13T23:34:22+5:302018-12-13T23:35:14+5:30
भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीला गोवर-रुबेलाची लस दिल्यानंतर दोन दिवसातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाला आरोग्य विभागाने अद्यापही गंभीरपणे घेतले नाही, परंतु मेडिकल प्रशासन याच्या मुळापर्यंत जाऊ इच्छिते. त्यानुसार गुरुवारी पुनरावलोकन समिती स्थापन केली. शुक्रवारी या समितीचा अहवाल येऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीला गोवर-रुबेलाची लस दिल्यानंतर दोन दिवसातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाला आरोग्य विभागाने अद्यापही गंभीरपणे घेतले नाही, परंतु मेडिकल प्रशासन याच्या मुळापर्यंत जाऊ इच्छिते. त्यानुसार गुरुवारी पुनरावलोकन समिती स्थापन केली. शुक्रवारी या समितीचा अहवाल येऊन मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
आराध्या वाघाये (११ महिने) रा. भंडारा असे मृताचे नाव आहे.
विविध आजारांपासून बालकांचा बचाव व्हावा यासाठी राज्य शासनाने ‘रुबेला-गोवर’ लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील एकही बालक लसीकरणातून सुटू नये यासाठी राज्य शासनाने प्रत्येक विभागाला उद्दिष्ट दिले आहे. लसीकरणाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. मात्र, लाखामध्ये एखादे प्रकरण गंभीर होऊ शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आराध्याला ५ डिसेंबर रोजी गोवर-रुबेलाची लस देण्यात आली. दुसऱ्याच दिवशी तिची प्रकृती खालावल्याने भंडारा येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात नंतर सामान्य रुग्णालयात तर त्याच दिवशी दुपारी नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच ७ डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. याचे सर्वप्रथम वृत्त ‘लोकमत’ने १२ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले. यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली. मेडिकलने शवविच्छेदनासारखीच ‘क्लिनिकल आॅटोप्सी’ची तपासणी केली. यात आराध्याच्या शरीरातील मेंदू, यकृत, फुफ्फुस, मूत्रपिंडासह इतर अवयवांचे अंश घेऊन सूक्ष्म निरीक्षण केले जाते. याचा प्राथमिक अहवालात ‘टॉक्सिक शॉक सिंड्रोम’चा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणातील हिस्टोपॅथोलॉजी व मायक्रोबॉयलॉजीच्या काही तपासण्यांचाअहवाल प्रलंबित आहे. तो शुक्रवारी प्राप्त होणार आहे. दरम्यान बालरोग विभागाच्या एका वरिष्ठ डॉक्टरने आराध्याच्या उपचाराच्या कागदपत्रात विंचू चावल्याची शंका उपस्थित करणारी नोंद केली आहे. परंतु नातेवाईकांनी अशी कुठलीही घटना व शरीरावरही तशी खूण नसल्याचे सांगितले. यामुळे संबंधित डॉक्टरही अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान गुरुवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी या प्रकरणी पुनरावलोकन समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. या समितीत मेयोच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर बोकडे, मेडिकलच्या विभाग प्रमुख डॉ. दीप्ती जैन व डॉ. सायरा मर्चंट यांचा समावेश आहे.