‘वायु’ चक्रीवादळाने मान्सून लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:28 AM2019-06-15T00:28:50+5:302019-06-15T00:30:06+5:30
जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला आहे. तरीही मान्सूनचा पत्ता नाही. इतकेच नव्हे तर मान्सूनपूर्व पडणाऱ्या मुसळधार पावसाचीही प्रतीक्षा आहे. काही दिवसापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. परंतु ‘वायु’ चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. नागपूरकरांना मान्सूनच्या पावसासाठी किमान २५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला आहे. तरीही मान्सूनचा पत्ता नाही. इतकेच नव्हे तर मान्सूनपूर्व पडणाऱ्या मुसळधार पावसाचीही प्रतीक्षा आहे. काही दिवसापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. परंतु ‘वायु’ चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. नागपूरकरांना मान्सूनच्या पावसासाठी किमान २५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
नागपूरच्या आकाशात ढग दाटून येत होते. परंतु ‘वायु’ चक्रीवादळाने जोर पकडताच नागपूरसह विदर्भातील आकाशातून काळे ढग निघून गेले आहेत. शुक्रवारी पूर्व नागपूरसह शहरातील काही भागात जोरदार हवा आणि पावसाच्या काही सरी पडल्या. काही मिनिटाच्या या पावसामुळे उकाडा आणखी वाढला आहे. मागील काही दिवसांपासून नागपूरकर उकाड्यामुळे त्रस्त आहेत.
नागपुरात १० जूनपर्यंत मान्सून पोहोचतो. परंतु यंदा दक्षिण भारतातच मान्सून आठ दिवस विलंबाने पोहोचला. त्यानंतर वायु चक्रीवादळाने मान्सूनच्या गतीला प्रभावित केले आहे. अशा परिस्थितीत नागपुरात जो मान्सून २० जून रोजी सक्रिय होणार होता. तो आणखी लांबला आहे. वायु चक्रीवादळामुळे ढगांची आर्द्रताही प्रभावित झाली आहे. त्यामुळे नागपुरात जून महिन्यातही पारा सरासरीपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा तीन डिग्री अधिक म्हणजे ४३ आणि ३०.५ डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले आहे.
संपूर्ण विदर्भच तापतोय
साधारणपणे जूनच्या मध्यात पाऊस होतो. परंतु सध्या पूर्ण विदर्भातच दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सध्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिवस व रात्रीचे तापमान सरासरपेक्षा तीन ते पाच डिग्री सेल्सियसने अधिक आहे. यामुळे ही कडक उन त्रासदायक ठरत आहे. जून महिन्यात ४० डिग्रीपेक्षा कमी तापमान राहते. यंदा सर्व जिल्ह्यातील तापमान अधिक आहे. शुक्रवारी ४४.६ डिग्री तापमानासह चंद्रपूर सर्वाधिक उष्ण राहिले. याशिवाय ब्रह्मपुरी ४४.५ डिग्री सेल्सियस, गडचिरोली ४४.२, वर्धा ४३, अकोला ४२.२, अमरावती ४०.८, यवतमाळ ४०.५, वाशिम ४०, बुलडाणा ३९ डिग्री सेल्सियस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे.