अत्यल्प पर्जन्यमानामुळे वर्धा परिसरातील शेतकऱ्यांच्या ओलिताला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:54 PM2019-02-19T12:54:51+5:302019-02-19T12:56:59+5:30
वर्धा जिल्ह्यात बोर प्रकल्पासह दहा लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांनी तळ गाठला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्यात बोर प्रकल्पासह दहा लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मात्र या वर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जलाशयांनी तळ गाठला आहे. केवळ पोथरा हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरला आहे. अन्यत्र पाण्याअभावी दुष्काळाची परिस्थिती भिषणावह आहे. बोर सिंचन प्रकल्पाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या २५ ते ३० गावांमध्ये शेतातील विहिर आटल्या असून फेब्रुवारी महिन्यातच दर तासानंतर शेती पंपाद्वारे होत असलेले ओलित थांबवावे लागत आहे. गेल्या २५ वर्षांत असा प्रसंग यंदाच अनुभवावा लागत असल्याचे या भागातील दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
वर्धा जिल्ह्यातील बोर सिंचन प्रकल्पा सर्वात जुना प्रकल्प आहे. १९५८ ते ६५ दरम्यान हा सिंचन प्रकल्प उभा करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत जवळपास २५ ते ३० गावांना पाणी शेतीसाठी दिले जाते. मात्र यावर्षी पावसाअभावी वर्धा जिल्ह्यातील सर्वच लघू व मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. या प्रकल्पामध्ये पाणी नसल्याने परिसरातील शेतातील विहिरींची पातळीही घसरली आहे. या भागात ओलिताची सोय असल्याने शेतकरी दुबार पीक घेत होते. यंदामात्र धरणाचे पाणी चना, व गहू पिकासाठी मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही पिकांचे क्षेत्र घटलेले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिर आहे. त्या शेतकऱ्यांनी जवळील पाण्याच्या भरोश्यावर गहू लावला मात्र आता विहिरीचे पाणी तुटत असल्याने गव्हाच्या ओलितावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे यंदा धरण पट्ट्यातील अनेक गावात पिकाअभावी शेत रिकामे पडून आहे. तर धरणालगतच्या गावांमधून दुधाळू जनावरे घेऊन गवळी समाजाचे लोक दुसऱ्या गावात स्थानांतरीत होत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तसेच या परिसरातील पाणी पुरवठा योजनाही प्रभावित झाल्या आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने बोरधरण भरले नाही. त्यामुळे रब्बी हंगामात गहू, चना पिकाला पाणी मिळाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी विहिरीवरील पाण्याच्या भरोश्यावर गहू व चना पीक घेतले. त्यांनाही आता विहिरीची पाणी पातळी कमी झाल्याने ओलितावर फटका बसत आहे. दर तासानंतर मोटरपंप बंद करावे लागत आहे. व विहिरीला पाणी येण्याची वाट पहावी लागत आहे.
अमीत सुधाकर माहुरे, शेतकरी, जाखाळा घोराड