दहा कंत्राटदारांना दणका
By Admin | Published: November 6, 2016 02:04 AM2016-11-06T02:04:20+5:302016-11-06T02:04:20+5:30
शहरातील उखडलेल्या रस्त्यांच्या चौकशीत १८ रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे आढळून आले आहे.
नागपूर : शहरातील उखडलेल्या रस्त्यांच्या चौकशीत १८ रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे आढळून आले आहे. यातील दोषी १० कंत्राटदारांना वर्ग -१(अ) मधून वर्ग -१(ब) मध्ये पदावनत करण्यात यावे. तसेच दायित्व कालावधीतील उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती दोन महिन्यात न केल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिले. लोकमतने ‘लोकमत जागर’च्या माध्यमातून या विषयावर पालिका प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले होते, हे विशेष.
१८ रस्त्यांपैकी कंत्राटदार मे. ओ.जी. बजाज यांचे आठ रस्ते असल्याने त्यांना एकट्यालाच पदावनत करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशसानाने स्थायी समितीकडे पाठविला होता. परंतु उर्वरित १० रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याने सर्व दोषी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.
पदावनत करण्यात येणाऱ्या कंत्राटदारात बजाज यांच्यासह मे. अमृत कन्स्ट्रक्शन, मे. प्रेमचंद राचूूमल, मे.आर.एम.गोपलानी, मे.पी.एम. ए. कन्स्ट्रक्शन,मे.अंकित कन्स्ट्रक्शन,मे.सेठ कन्स्ट्रक्शन, मे.फोनिक्स इंजिनिअरिंग, मे.एल.सी. गुरुबक्षानी आदींचा समावेश आहे. या सर्व कंत्राटदारांना तीन महिन्यासाठी पदावनत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जे कंत्राटदार वर्ग-१(अ)श्रेणीत नसतील त्यांना प्राप्त श्रेणीतून पदावनत क रण्याचा निर्णय घेण्यात आला. दायित्व कालावधी न संपलेल्या रस्त्यांची एक महिन्यात दुरुस्ती करावी. निर्धारित कालावधीत दुरुस्ती न केल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश राऊ त यांनी दिले.
नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांचे टप्पा-३ अंतर्गत सर्वेक्षण करून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. स्थायी समितीने यापूर्वी ३९ रस्त्यांच्या सिमेंटीकरणाला मंजुरी दिलेली आहे. या रस्त्यांचे विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय सहा पॅकेजेसमध्ये विभाजन करण्यात आले आहे. त्यानुसार उत्तर नागपूर सहा, मध्य नागपूर पाच, पूर्व नागपूर पाच, पश्चिम व दक्षिण नागपूर प्रत्येकी सात व दक्षिण-पश्चिम क्षेत्रात नऊ रस्ते मंजूर आहेत. याला मंजुरी देण्यात आली. या कामावर २३६ कोटी ७० लाखांचा खर्च केला जाणार आहे. (प्रतिनिधी)