पिपळा दहण घाटावरच कचरा डम्पिंग, प्रशासनाचे दुर्लक्ष
By मंगेश व्यवहारे | Published: July 5, 2023 03:26 PM2023-07-05T15:26:29+5:302023-07-05T15:28:39+5:30
घाटाची पुरती दुरावस्था
नागपूर : शहराची हद्द संपल्यासंपल्या पिपळा दहण घाट लागलो. नाल्याच्या काठावर असलेल्या या घाटावर परिसरातील अख्खा कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे या घाटाची अवस्था कचरा डम्पिंग झाल्यासारखी आहे. घाटावर जागोजागी कचरा पसरला आहे. गुरांचा वावर येथे आहे. मात्र दहनघाटावर असलेल्या कुठल्याही सुविधा येथे नाही.
शहरालाच लागून असलेला हा घाट पूर्वी पिपळा (घोगली) ग्रामपंचायती अंतर्गत येत होता. या भागात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले, भूरपूर लेआऊट पडले, मोठमोठ्या स्कीम उभ्या झाल्या. बेसा, पिपळा या ग्रामपंचायतींना शहराचा लूक आल्याने नगरविकास विभागाने बेसा व पिपळा या ग्रामपंचायतींना बेसा-पिपळा नगरपंचायतीचा दर्जा दिला. त्यामुळे आता हा घाट बेसा-पिपळा नगर पंचायतच्या हद्दीत येत असतानाही घाटाची पुरती दुरावस्था झाली आहे.
या घाटावर अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची सोय नाही. केवळ शेड टाकून ठेवले आहे. येथे लाकडाची सोय कुटुंबियांनाच करावी लागते. घाटावर अन्यही सोयी नाही. निव्वळ कचरा पडला आहे. त्यामुळे घाटाजवळील शहर हद्दीतील लोकंही मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी मानेवाडा घाटावर येत आहे. घाटाचा परिसर मोठा असतानाही सोयीसुविधा नाही. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे स्थानिक नागरीक विशाल कोरके यांनी सांगितले.