नागपुरातील डंपिंग यार्ड भांडेवाडीत कचऱ्याचे ढीग साठले, प्रक्रिया बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 10:16 AM2018-04-04T10:16:11+5:302018-04-04T10:16:19+5:30
सध्या शहरातील १२०० मेट्रिक टन कचरा येथे आणला जातो. परंतु गेल्या महिनाभरापासून मे. हंजर बायटेक एनर्जी कंपनीचा प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. त्यामुळे प्रक्रिया न करताच कचरा साठविला जात आहे.
राजीव सिंग।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील भांडेवाडी डम्पिंग यार्ड महापालिकेपुढे एक आव्हानच आहे. राजकीय पक्षासाठी हा ज्वलंत मुद्दा आहे. या भागातील डम्पिंग यार्ड हटविण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. यासाठी आंदोलनेही झाली. डम्पिंग यार्ड हटणार असल्याच्या घोषणाही करण्यात आल्या. परंतु डम्पिंग यार्ड कायम आहे. एवढेच नव्हे तर गतकाळात शहरातून संकलित केलेला कचरा येथे आणल्यानंतर त्यातील निम्म्या कचऱ्यावर प्रक्रिया होत होती. खत व विटा तयार केल्या जात होत्या. सध्या शहरातील १२०० मेट्रिक टन कचरा येथे आणला जातो. परंतु गेल्या महिनाभरापासून मे. हंजर बायटेक एनर्जी कंपनीचा प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. त्यामुळे प्रक्रिया न करताच कचरा साठविला जात आहे. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास भांडेवाडीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे.
सन २००८ मध्ये शहराला कचरामुक्त करण्यासाठी घराघरातून कचरा संकलन करण्याला सुरुवात झाली. सुरुवातीला दररोज ९०० ते १००० मेट्रिक टन कचरा संकलित केला जात होता. यातील ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती. शहराचा झालेला विस्तार व लोकसंख्या वाढल्याने कचराही वाढला आहे. आता दररोज १२०० मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. परंतु यावर प्रक्रिया न करताच साठविला जातो. सध्या निवडणुका नसल्याने डम्पिंग यार्डचा प्रश्नही मागे पडला आहे. ‘लोकमत’प्रतिनिधीने भांडेवाडी परिसराचा आढावा घेतला असता धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या.
प्रक्रिया केंद्रात कचऱ्याचे ढिगारे
गेटमधून आत गेल्यानंतर १० मीटर अंतरावर उजव्या बाजूला असलेल्या हंजर बायोटेकचे कार्यालय, वजनकाटा, प्रक्रिया केंद्र दिसायचे. परंतु सध्या कार्यालय मोडकळीस आले आहे. वजनकाटा हटविण्यात आला आहे. प्रक्रिया केंद्राच्या शेडमध्ये कचऱ्याचा ढिगारा साचला आहे. सगळीकडे बंद पडलेली यंत्रसामुग्री आहे. माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्यासह भाजपाचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी भांडेवाडी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथे जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. लोकांना डम्पिंग यार्डची भीती वाटू नये, हा त्यामागील हेतू होता. परंतु आता सगळीकडे कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत.
कचरा गोळा करणाऱ्यांचा मुक्त संचार
भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरात कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करण्याची अनुमती महापालिकेने दिली आहे. दुपारी २ वाजताच्या सुमारास १० ते १२ा कचरा वेचणारे दिसून आले. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. हातात ग्लोव्हज न घालता कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून पॉलिथीन, प्लास्टिक, बॉटल व भंगार साहित्य गोळा करीत होते. परिसरात जेसीबी, पोकलँड मशीन कचऱ्याचे ढिगारे लावत होत्या. विशेष म्हणजे दिल्ली महापालिकेने कचरा वेचणाऱ्यांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य उपलब्ध केले आहे.
सुरक्षा रामभरोसे
भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत जाण्यासाठी अर्धा किलोमीटर उखडलेल्या रस्त्यांवरून जावे लागले. आत प्रवेश करताच एक सुरक्षा रक्षक दिसला. त्याने आत येण्याचे कारण विचारले. त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी माहिती विचारल्यानंतर समोरील कार्यालयाकडे इशारा केला. पुढे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभे राहिल्यानंतर भांडेवाडीचे दृश्य निदर्शनास आले.
मनपा प्रशासन अनभिज्ञ
पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर यांच्याकडे भांडेवाडी येथील कचरा प्रक्रिया केंद्राची जबाबदारी आहे. त्यांना यासंदर्भात विचारणा केली असता येथे २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु प्रक्रिया केंद्र बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले असता, यासंदर्भात माहिती घेऊ , असे ते म्हणाले. मात्र नंतर त्यांनी वीज बिल थकीत असल्याने प्रक्रिया केंद्र बंद असल्याची कबुली दिली. यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.