अंबाझरी उद्यान की डम्पिंग यार्ड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:07 AM2021-02-24T04:07:13+5:302021-02-24T04:07:13+5:30

सकाळी ९ वाजले की कुलूप : नागरिकांनी फिरायचे कुठे : आंबेडकर सांस्कृतिक भवनाला बनवले गोदाम लोकमत न्यूज नेटवर्क ...

Dumping yard of Ambazhari garden? | अंबाझरी उद्यान की डम्पिंग यार्ड?

अंबाझरी उद्यान की डम्पिंग यार्ड?

Next

सकाळी ९ वाजले की कुलूप : नागरिकांनी फिरायचे कुठे : आंबेडकर सांस्कृतिक भवनाला बनवले गोदाम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अंबाझरी उद्यान नागरिकांसाठी दिवसभर सुरू असायचे. आता ते सकाळी ९ पर्यंतच असते. त्यानंतर दिवसभर उद्यानाला कुलूप असते. तिजोरीत पैसा नसल्याने महापालिकेने अंबाझरी उद्यान वर्षभरापूर्वी महराष्ट्र पर्यटन विकास मंडळाकडे हस्तांतरित केले. विकास व्हावा यासाठी हा खटाटोप केला. परंतु वर्षभरात परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. उद्यानाचे सौंदर्य हरपले आहे. जागोजागी कचरा साचला आहे. बसण्याची बाके तुटली आहेत. जीममधील साधने नादुरुस्त आहेत. गेटपासूनच रस्ता उखडला आहे. मनोरंजनाची उपकरणे बंद पडली आहेत. एकीकडे नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा करायचा अन् दुसरीकडे शहराचे वैभव असलेल्या अंबाझरी उद्यानाला अवकळा आली आहे. शहराचा हाच का विकास, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

...

आंबेडकरी चळवळीचे केंद्र बनले गोदाम

आंबेडकरी चळवळीच्या कार्यक्रमासाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या अंबाझरी उद्यानालगतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सिमेंट गोदाम बनले आहे. येथे सिमेंट पोती, साहित्य ठेवले जाते. परिसरात मलबा साठवला आहे. नागरिकांच्या निदर्शनास ही बाब येऊ नये, यासाठी या परिसराला टिनाची भिंत घातली आहे. अंबाझरीच्या १८ एकर परिसरातील सांस्कृतिक भवनाची जागा हडपण्याचे प्रयत्न काही कंत्राटदारांनी चालविले आहे. यातूनच भवनाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

१९७६ मध्ये १८.८६ एकर परिसरातील काही जागेत भवनाचे बांधकाम केले होते. परंतु मागील २० वर्षांत महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. देखभाल तर दूरच ही जागाच हडपण्याचे प्रयत्न सुरू आहे. भवनाची देखभाल व दुरुस्ती व्हावी, यासाठी मनपा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली, परंतु दखल घ्यायला कुणी तयार नाही.

,....्र

देवतळे ले-आऊटच्या रस्त्याचा विसर

अंबाझरी परिसरातील वर्मा ले-आऊट, डागा ले-आऊट, न्यू वर्मा ले-आऊट, हिलटॉप, मानवतानगर, गांधीनगर, पुरोहित ले-आऊट परिसरातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्यात आले. परंतु देवतळे ले-आऊटचा मनपाला विसर पडला आहे. अनेकदा तक्रारी करूनही नगरसेवक व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली.

...

सार्वजनिक वापराच्या जागेवर कब्जा

पुरोहित ले-आऊट येथे सार्वजनिक वापरासाठी जागा सोडण्यात आली होती. परंतु पुढे ले-आऊट मालकांनी या जागेवर कब्जा केला आहे. न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता जागा कब्जात घेतली. तक्रार करूनही मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.

....

डुकरांचा संचार

अंबाझरी उद्यान नागरिकांसाठी खुले नसले तरी जंगली डुकरांसाठी सुविधा झाली आहे. सायकांळ झाली की येथे डुकरांचा संचार असतो. उद्यानातून जंगल भागाकडे जाणारे ट्रॅक बंद करण्यात आले आहेत. यामुळे सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या निसर्गप्रेमींना जंगल भागाकडे जाता येत नाही. एमटीडीसीकडे हस्तांतर केल्याने उद्यानाचा कायापालट होईल, अशी अपेक्षा होती. परंतु वर्षभरात परिस्थितीत बदल झालेला नाही.

....

ज्येष्ठांनी बसायचे कुठे?

अंबाझरी उद्यानात बसण्यासाठी असलेले बेंच तुटले आहेत. जागोजागी अस्वच्छता आहे. गेटपासूनच रस्ता नादुरुस्त आहे. सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी असलेले बेंच तुटले आहेत. अशापरिस्थितीत त्यांनी बसायचे कुठे? उद्यानात गुलाब बाग होती. या बागेची देखभाल व्हायची. परंतु आता ती नष्ट झाली आहे. देखभाल होत नसल्याने उद्यानाला अवकळा आली आहे. एमटीडीसीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

नरेश ताजनेकर

....

ग्रीन जीम बंद, झाडे तोडली

उद्यानात नवीन झाडे लावली जात नाही. दुसरीकडे असलेली जुनी झाडे तोडली जात आहेत. मागील काही महिने उद्यान बंदच होते. उद्यान सुरू व्हावे, यासाठी या भागाचे आमदार विकास ठाकरे यांना नागरिक भेटणार होते. याची माहिती मिळताच एमटीडीसीने उद्यान सुरू केले. परंतु सकाळी ९ पर्यंतच सुरू असते. दिवसभर बंद असते. नागरिकांना फिरता यावे, यासाठी उद्यान दिवसभर उघडे ठेवण्याची गरज आहे. बंद राहत असल्याने नागरिकांना फिरता येत नाही.

गोपाल झाडे

...

हा कसला विकास?

शहराचा चौफेर विकास होत असल्याचा दावा राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्यांशी संबंधित उद्यानाकडे दुर्लक्ष आहे. अंबाझरी उद्यानात माणसाला प्रवेश नाही, पण डुकरांचा मुक्त संचार आहे. जागोजागी कचरा साचून आहे. गतकाळातील वैभव हरपले आहे. परिसरात चांगले मोठे उद्यान नाही. असे असूनही नागरिकांना दिवसभर उद्यानात फिरता येत नाही. बाजूला असलेल्या आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा गोदाम म्हणून वापर केला जात आहे. मनपाच्या धोरणामुळे सांस्कृतिक चळवळ संपुष्टात येण्याचा धोका आहे.

एन.एल. सावरकर

...

प्रशासनाला जाग कधी येणार

कोरोना संक्रमण वाढत असताना प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. दुसरीकडे अंबाझरी उद्यानात नागरिकांना फिरता येत नाही. हे उद्यान दिवसभर नागरिकांसाठी खुले ठेवण्याची गरज आहे. येथे जागोजागी कचरा साचला असून ग्रीन जीमची साधने तुटली आहेत. परिसराला अवकळा आली आहे. सुरुवातीला अंबाझरी उद्यानात प्रवेशासाठी प्रवेश फी लागत नव्हती. परंतु देखभालीच्या नावाखाली व्यावसायिकीकरण सुरू झाले. परंतु त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही.

आर.एन. चांदूरकर

Web Title: Dumping yard of Ambazhari garden?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.