हुंडाबळी : सासूचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: May 5, 2017 02:47 AM2017-05-05T02:47:39+5:302017-05-05T02:47:39+5:30
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी महाजनवाडी येथील एका विवाहितेच्या हुंडाबळीप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी महाजनवाडी येथील एका विवाहितेच्या हुंडाबळीप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने आरोपी सासूचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
उमा विजयसिंग गौतम (५२), असे आरोपी महिलेचे नाव आहे. स्वाती विकास गौतम (३०), असे मृत विवाहितेचे नाव होते. ती २५ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास महाजनवाडी येथील आपल्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली होती.
हिंगणघाट येथील रहिवासी सुषमा धवसिंग गौर यांची मुलगी स्वाती हिचा विवाह २०१० मध्ये विकास विजयसिंग गौतम याच्यासोबत झाला होता. लग्नाला एक महिनाही झाला नसावा तोच सासरची मंडळी नेहमी पैशाची मागणी करीत होते. तिला क्रूर वागणूक देत होते. तू मरत असशील तर, असे ते तिला म्हणायचे.
स्वातीच्या मृत्यूच्या घटनेनंतर पोलिसांनी प्रारंभी ३०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ३०४ (ब) हे कलम वाढवण्यात आले होते. पोलिसांनी पती विकास आणि सासरे विजयसिंग गौतम यांना अनुक्रमे २६ आणि २८ एप्रिल रोजी अटक केली. ते कारागृहात आहेत.
सासू उमाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता, सरकारतर्फे विरोध करण्यात आला. स्वातीच्या मृत्यूच्या घटनेच्या वेळी केवळ सासू उमा हजर होती. त्यामुळे गळफास घेण्यापूर्वी काय घडले, हे उमालाच माहीत आहे. तीच या घटनेमागील मुख्य सूत्रधार आहे, तिला अटक होणे आवश्यक आहे. सरकार पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने उमाचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील पंकज तपासे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)