नागपुरातील शेणाच्या पणत्यांची परदेशवारी :अंबिलवादे कुटुंबाची अशीही गोसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 10:14 PM2019-10-29T22:14:54+5:302019-10-29T22:17:43+5:30

महाल येथील रहिवासी यामिनी अंबिलवादे व त्यांच्या कुटुंबाने तयार केलेल्या पणत्या देशातच नाही तर परदेशातही लक्ष वेधत आहेत. पंचगव्याचे तत्त्व मिळून तयार केलेल्या असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अधिक आहे.

Dung lamp in Nagpur abroad: Cow service to the Ambilvade family | नागपुरातील शेणाच्या पणत्यांची परदेशवारी :अंबिलवादे कुटुंबाची अशीही गोसेवा

नागपुरातील शेणाच्या पणत्यांची परदेशवारी :अंबिलवादे कुटुंबाची अशीही गोसेवा

Next
ठळक मुद्देगोमयद्वारे पर्यावरण संवर्धनाचा ध्यास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीचा सण म्हणजेच प्रकाशपर्व सध्या सर्वत्र साजरा होत आहे. छोटीशी पणती म्हणजे या प्रकाशपर्वाचे प्रतीकच होय. मातीच्या पणत्या व दिव्यांना यावेळी महत्त्व असते. पण सध्या चर्चा आहे ती गाईच्या शेणापासून निर्मित पणत्यांची. महाल येथील रहिवासी यामिनी अंबिलवादे व त्यांच्या कुटुंबाने तयार केलेल्या या पणत्या देशातच नाही तर परदेशातही लक्ष वेधत आहेत. पंचगव्याचे तत्त्व मिळून तयार केलेल्या असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अधिक आहे.
‘गोमय वसते लक्ष्मी’, असे म्हणतात. गाईपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट ही मानवी जीवन सुकर बनविण्यासाठी लाभदायक आहे. म्हणूनच आपल्या देशात गाईला माता म्हणून मान मिळतो, तो यामुळेच. गाईचे शेण, गोमुत्र आदी पंचगव्य हे अनेक दृष्टीने लाभदायक आहे. या गोमयापासून विविध वस्तू तयार करण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जात आहे. अंबिलवादे कुटुंबानेही समाजात गोमय वस्तूंच्या प्रचार प्रसाराचा ध्यास घेतला आहे. गाईचे शेण व आयुर्वेदिक वनस्पतींचे मिश्रण करून तयार केलेल्या पणत्या हा त्याचे दृष्टीने केलेला प्रयत्न होय. खरतर यामिनी यांचे पती अ‍ॅड. नीलेश अंबिलवादे यांना गाईविषयी नितांत आदर. देवलापारच्या गोविज्ञान संशोधन केंद्रापासून प्रेरणा घेत आपणही पंचगव्यापासून काही निर्मिती करून लोकांना रोजगार द्यावा, असा त्यांचा विचार. मात्र वकिली व्यवसायात असल्याने वेळ मिळणे कठीण. पतीचे हे ध्येय यामिनी यांनी आपल्या खांद्यावर घेतले.
आधी एक गाय घेऊन तिच्या शेणापासून पणत्या बनवून पाहिल्या. त्यात त्यांना यश आले. या पणत्या लोकांनाही आवडू लागल्या. त्यामुळे अंबिलवादे कुटुंबाने या प्रयोगाला व्यापक रूप देण्याचा निर्धार केला. उमरेड रोडवरील त्यांच्या शेतात गोशाळा स्थापन केली, जिथे आजघडीला १७० गाई आहेत. या छोट्या पणत्या सहज तयार करता येईल, यासाठी साचा असलेले मशीनही बनवून घेतले. त्यांच्या गोशाळेतून आज दररोज ५००० पणत्यांची निर्मिती होत असून अनेक महिलांनाही रोजगार मिळाला आहे. यामिनी यांना पती व कुटुंबाचे सहकार्य मिळत आहे पण सोबत राम नगरकर, शाम व प्रतीक्षा नगरकर यांनीही हा व्याप सांभाळण्यात हातभार लावला आहे. दुसरीकडे यामिनी यांचे भाऊ गिरीश नगरकर यांनी पुण्यात या पणत्यांच्या प्रचार प्रसाराची धुरा सांभाळली असून त्यांच्या माध्यमातूनच या पणत्या मुंबई व परदेशातही पोहचल्या आहेत.
पणत्यांना मिळालेले यश पाहता त्यांनी शेण व पंचगव्यापासून धूपबत्ती, सजावटीचे तोरण, विटा आदी वस्तू बनविण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही यावर्षी गणेशोत्सवात माती व शेणाच्या मिश्रणातून गणेश मूर्तीही तयार करण्यात आल्या होत्या आणि भाविकांनी या मूर्तींना पसंती दिली होती. त्यांनी दिवाळीच्या काळात निव्वळ शेणापासून आकर्षक लक्ष्मीच्या मूर्त्याही तयार केल्या आहेत. यासाठी त्यांनी देशी गाईला प्राधान्य दिले हे विशेष. गोसेवा समजून ती प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे एक प्रेरणादायी उदाहरण अंबिलवादे कुटुंबाने समोर ठेवले आहे.

एका पणतीतून दीड किलो ऑक्सिजन
गाईचे शेण नदीत गेले तर ते पाणी शुद्ध करण्याचेच काम करते. पुरातन काळात केल्या जाणाऱ्या अग्निहोत्रामध्ये शेणाचाच उपयोग केला जायचा व ते पर्यावरण शुद्ध करण्यास कारणीभूत ठरत होते. या पणतीद्वारे तोच प्रयत्न केला आहे. तूप किंवा तेल टाकून ही पणती पेटविली तर काही वेळाने ती पूर्णपणे जळून जाते व त्यातून निघणाऱ्या धुरातून दीड किलो ऑक्सिजनचे उत्सर्जन होत असल्याचा दावा यामिनी अंबिलवादे यांनी केला. पूर्ण जळल्यानंतर निघणारी राख घरच्या बागेत खत म्हणून उपयोगात आणली जाऊ शकते. तयार केलेल्या इतरही वस्तू तेवढच्या उपयोगाच्या आहेत. लोकांना महत्त्व पटले व मागणी वाढल्याने आज ५००० पणत्यांची निर्मिती दररोज केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

Web Title: Dung lamp in Nagpur abroad: Cow service to the Ambilvade family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.