खोपडेंच्या शैक्षणिक पात्रतेत तफावत
By admin | Published: June 24, 2015 03:02 AM2015-06-24T03:02:13+5:302015-06-24T03:02:13+5:30
खोटी शैक्षणिक पात्रता दाखविण्याचे एकएक प्रकरण समोर येत असताना आता पूर्व नागपूरचे आमदार व भाजपाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे ....
विधानसभा सदस्यत्व रद्द करा : राष्ट्रवादीची मागणी
नागपूर : खोटी शैक्षणिक पात्रता दाखविण्याचे एकएक प्रकरण समोर येत असताना आता पूर्व नागपूरचे आमदार व भाजपाचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात दोन वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता नमूद केल्याचे समोर आले आहे.
खोपडे यांनी २००९ व २०१४ च्या निवडणुकीत सादर केलेले शपथपत्र जारी करीत खोपडे यांनी शिक्षणाच्या बाबतीत खोटे शपथपत्र दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाची फसवणूक केल्यामुळे खोपडे यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही लोंढे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आ. खोपडे यांनी २००९ मध्ये सादर केलेले शपथपत्र व २०१४ मध्ये जारी केलेले शपथपत्र प्रसिद्ध केले आहे. २००९ च्या निवडणूक शपथपत्रात आ. खोपडे यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता १२ वी पास व बी.कॉम. प्रथम वर्ष अशी नमूद केली आहे.
तर त्यानंतर पाच वर्षांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या निवडणूक शपथपत्रात शैक्षणिक पात्रता ७ वी पास असल्याचे व विद्या नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इतवारी येथून पास झाल्याचे नमूद केले आहे. एकाच व्यक्तीने दिलेल्या दोन शपथपत्रात वेगवेगळी शैक्षणिक पात्रता कशी दाखविली जाऊ शकते, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला असून याप्रकरणी खोपडे यांनी निवडणूक आयोगाची सपशेल फसवणूक केली असल्याचा दावाही लोंढे यांनी केला आहे. नैतिकतेवर बोलणारी भाजपा आता खोटे शपथपत्र देणाऱ्यांवर गप्प का, असा सवाल लोंढे करीत याप्रकरणी पक्षाने खुलासा करावा, अशी मागणीही लोंढे यांनी केली आहे.
याबाबत आ. खोपडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, लोंढे हे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आहेत. त्यांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर राज्य पातळीवरील प्रकरणे हाताळण्यासाठी केला असता तर बरे झाले असते. आपण निवडणूक आयोगाची कुठलीही फसवणूक केलेली नाही.
२००९ मध्ये शपथपत्रात नजरचुकीने शिक्षण १२ वी पास व बी.कॉम. नमूद करण्यात आले होते. २०१४ मध्ये आपण ती चूक सुधारली, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
२००९ मध्ये भाजपच्या सर्वच उमेदवारांनी एकाच अर्जनविसाकडे शपथपत्र तयार केले. तेथे नजरचुकीने दुसऱ्या कुठल्या उमेदवाराचे १२ वी पास व बी.कॉम. प्रथम वर्ष हे शिक्षण माझ्या शपथपत्रात नमूद करण्यात आले. त्या वेळी घाईघाईत ही बाब लक्षात आली नाही. ही नजरचूक लक्षात आल्यानंतर २०१४ मध्ये त्याच दुरुस्ती केली व ७ वी पास नमूद केले. या नजरचुकीसाठी मी आधीच जनतेची माफी मागितली आहे. मला फसवणूक करायची असती तर मी बी.कॉम. पदवी पूर्ण झाल्याचे नमूद केले असते. मात्र, मलाच खोट्याचा आधार नको आहे. राजकीय द्वेषातून कुणी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी जनता माझ्या पाठीशी आहे.
- आ. कृष्णा खोपडे
शहर अध्यक्ष, भाजपा