ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर : संतप्त जमावाचा कोतवाली ठाण्याला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:05 AM2019-04-02T00:05:56+5:302019-04-02T00:06:35+5:30
ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर करून जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे बेपत्ता झाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी कोतवाली पोलीस ठाण्याला सोमवारी घेराव घातला. माहिती देऊनही पोलिसांनी प्रकरण थंडपणाने हाताळल्यामुळे अनेकांना आर्थिक फटका देणारा संस्थाध्यक्ष बेपत्ता झाल्याचा जमावाने आरोप केला. पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कोतवाली ठाणे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सावरासावर करूनही ठेवीदारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री १०.३० पर्यंत यश न आल्याने पोलीस ठाण्यासमोर गुंतवणूकदार ठिय्या देऊन होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर करून जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे बेपत्ता झाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी कोतवाली पोलीस ठाण्याला सोमवारी घेराव घातला. माहिती देऊनही पोलिसांनी प्रकरण थंडपणाने हाताळल्यामुळे अनेकांना आर्थिक फटका देणारा संस्थाध्यक्ष बेपत्ता झाल्याचा जमावाने आरोप केला. पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त ठेवीदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कोतवाली ठाणे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सावरासावर करूनही ठेवीदारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री १०.३० पर्यंत यश न आल्याने पोलीस ठाण्यासमोर गुंतवणूकदार ठिय्या देऊन होते.
तुकडोजी चौकाजवळच्या गणेशनगरात जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे कार्यालय असून, संस्थेचे अध्यक्ष खेमचंद मेहरकुरे आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या संस्थेत हजारो गुंतवणूकदार सभासद (खातेधारक) आहेत. अल्पावधीत मोठ्या व्याजाचे आमिष संस्थाध्यक्ष आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तीकडून मिळाल्याने शेकडो जणांनी या संस्थेत आपली रक्कम गुंतविली. कुणी फिक्स डिपॉझिट तर कुणी डेली कलेक्शन करणाऱ्याच्या हातात रक्कम दिली. कोट्यवधींच्या ठेवी संस्थेत जमा झाल्या असताना संस्थाध्यक्षाने एका अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीला तसेच त्याच्या जवळच्या व्यक्तींना या संस्थेशी जोडले आणि नंतर संस्थेची आर्थिक अवस्था बिघडत गेली. दरम्यान, रक्कम गुंतविणाऱ्यांची मुदत पूर्ण झाल्याने ठेवीदारांनी आपली रक्कम परत मागण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात चकरा मारणे सुरू केले तर संस्थाध्यक्ष मेहरकुरेने वेगवेगळ्या थापा मारून त्यांना टाळणे सुरू केले. दुसरीकडे मेहरकुरेने मुख्य कार्यालयासह शहरातील अन्य भागात उघडलेल्या संस्थेच्या शाखाही बंद केल्या. दरम्यान, मेहरकुरेची थापेबाजी लक्षात आल्याने १४ फेब्रुवारीला ठेवीदारांनी कोतवाली ठाण्यात धाव घेतली. यावेळी मेहरकुरेंनी १ एप्रिलला सर्वांची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, पोलिसांनीही मेहरकुरेवर विश्वास ठेवण्याचा संतप्त ठेवीदारांना सल्ला दिला.
आज १ एप्रिलला अनेक ठेवीदारांनी मेहरकुरेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आऊट ऑफ रेंज असल्याचे लक्षात आल्याने ठेवीदारांनी दुपारी ४ च्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. संस्थेचे काही पदाधिकारी आणि एजंटही ठेवीदारांच्या सोबत होते.
त्यांनी संस्थाध्यक्ष मेहरकुरे आणि त्याच्या संपर्कातील अवैध सावकाराविरुद्ध कडक कारवाईची मागणी लावून धरली. जोरदार नारेबाजी करीत रात्री १०.३० वाजेपर्यंत कोतवाली ठाण्यासमोर मोठा जमाव उभा होता. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलीस अधिकारी करीत होते.
ठाण्याच्या आवारातच हाणामारी
ठेवीदार आणि त्यांच्या नातेवाईकांचा रोष लक्षात घेता पोलिसांनी मेहरकुरेसह संस्थेच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. मेहरकुरे गायब असल्याने येण्याचा प्रश्नच नव्हता. एक महिला व्यवस्थापक तेथे पोहचली. तिच्या कार्यशैलीने आधीच चिडून असलेल्या ठेवीदार तसेच एजंटस्नी तिच्यावरच रोष व्यक्त केला. एका महिलेने चक्क तिच्यावर धाव घेतली. त्यानंतर व्यवस्थापिका आणि त्या महिलेत ठाण्याच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
पोलिसांची झाली गोची
या प्रकरणात संस्थाध्यक्ष व त्याच्या साथीदारावर दाखविलेल्या विश्वासामुळे आता पोलिसांचीही गोची झाली आहे. पोलिसांनी मेहरकुरे आणि त्याच्यासोबत भागीदारी करणारा विठ्ठल मेहर तसेच त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संस्थेचे उपाध्यक्ष योगेश चरडे यांनी २८ मार्चला कोतवाली ठाण्यात दुसरी तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी १५ मार्च तसेच २८ मार्चच्या तक्रारीची दखल घेणे तर सोडा मेहरकुरे, मेहर आणि त्यांच्या साथीदारांवर नजर ठेवण्याचेही टाळले. त्याचमुळे मेहरकुरे आणि त्याचे साथीदार शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची रक्कम गिळंकृत करून पळून गेले. परिणामी पोलिसांबाबतही ठेवीदार, पदाधिकारी आणि संस्थेच्या एजंटमध्ये रोष आहे.