कोरोना काळात तरुणांसाठी १०८ रुग्णवाहिका ठरली देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:07 AM2021-05-18T04:07:19+5:302021-05-18T04:07:19+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचा पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिकेची भूमिका महत्त्वाची ठरली. रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविता आल्याने ही ...
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिकेची भूमिका महत्त्वाची ठरली. रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविता आल्याने ही रुग्णवाहिका अनेकांसाठी देवदूत ठरली. कोरोनाच्या १४ महिन्यांच्या काळात नागपूर जिल्ह्यातील १५,३७३ रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेने सेवा दिली. विशेष म्हणजे, आपत्कालीन परिस्थतीत सर्वाधिक मदत तरुणांना झाली. १८ ते ४४ वयोगटांतील ३८.५ टक्के कोरोना रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका धावून गेली.
आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. राज्यात ९३७ रुग्णवाहिका २४ तास सेवा देत आहेत. नागपूर विभागात ११० तर नागपूर जिल्ह्यात ४० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात महानगरपालिकेच्या क्षेत्रात ११ तर ग्रामीण भागात २९ रुग्णवाहिका आहेत. मोफत असलेल्या या सेवेने केवळ अपघाताच्या रुग्णांनाच नव्हे, तर बाळंतपणासाठी अडलेल्या महिला, विषबाधेसह इतर सर्वच प्रकारची प्राथमिक मदत देत, त्यांना रुग्णालयात वेळेत पोहचता आले. मार्च, २०२० पासून ते एप्रिल, २०२१ या दरम्यान या रुग्णवाहिकेचा सर्वाधिक वापर कोरोनाबाधितांसाठी झाला. नागपूर जिल्ह्यात १५,३४३ रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्याची मोठी मदत झाली. यात शून्य ते १८ वयोगटांतील २.७ टक्के, १९ ते ४४ वयोगटांतील ३८.५ टक्के, ४५ ते ६० वयोगटांतील ३७.७ टक्के तर ६१ वर्षांवरील वयोगटांत २१.१ टक्के रुग्णांना सेवा दिली.
-४५ ते ६० वयोगटांतील सर्वाधिक रुग्णांकडून ऑक्सिजनची मागणी
१०८ रुग्णवाहिकेतून ऑक्सिजनची सुविधा दिलेल्या रुग्णांपैकी ४५ ते ६० वयोगटांतील सर्वाधिक रुग्ण होते. यांचे प्रमाण ४८ टक्के आहे. ६१ वर्षांवरील २७ टक्के तर, १८ ते ४४ वयोगटांतील २५ टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आले.
-दुसऱ्या लाटेत २,५०० रुग्णांना सेवा
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत १०८ रुग्णवाहिकेचा वापर ५ पटीने वाढला. फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात २,५०० कोरोना रुग्णांना सेवा देण्यात आली. शहराच्या उच्चभ्रू सोसायटी ते ग्रामीण भागातील खेडेगावातून या रुग्णवाहिकेची मागणी झाली.
- कोरोनाचा रुग्णांकडून रुग्णवाहिकेचा वापर
१८ वयोगटांपर्यंत : २.७ टक्के
१९ ते ४४ वयोगट ३८.५ टक्के
४५ ते ६० वयोगट ३७.७ टक्के
६१ वर्षांवरील वयोगट २१.१ टक्के
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या सहकार्याने आप्तकालीन परिस्थीतील रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेची मदत होत आहे. कोरोनाचा या काळात सर्वाधिक सेवेचा लाभ तरुणांनी घेतला. ही सेवा २४ तास व सर्वांसाठी मोफत आहे. ‘१०८’ नंबरवर ‘डायल’ करून ही सेवा उपलब्ध होते.
- प्रशांत गाठे, झोनल मॅनेजर, महाराष्ट्र इमरजन्सी मेडिकल सर्व्हिसेस