कोरोनाकाळात उच्च न्यायालयातील ६५४६ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:09 AM2021-07-28T04:09:44+5:302021-07-28T04:09:44+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ एप्रिल २०२० ते २० जुलै २०२१ या कोरोना संक्रमणाच्या कालावधीत एकूण ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ एप्रिल २०२० ते २० जुलै २०२१ या कोरोना संक्रमणाच्या कालावधीत एकूण ६ हजार ५४६ प्रकरणे निकाली काढली. तसेच या कालावधीत न्यायालयामध्ये ११ हजार २४३ नवीन प्रकरणेही दाखल झाली.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना उच्च न्यायालय प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. गेल्या वर्षी मार्चमध्ये देशात कोरोना संक्रमणाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे उच्च न्यायालयातील फिजिकल कामकाज थांबवून ऑनलाइन कामकाज सुरू करण्यात आले. दरम्यान, अत्यंत कमी कालावधीकरिता फिजिकल कामकाज सुरू झाले होते. परंतु, कोरोना संक्रमणाने पुन्हा जोर पकडल्यानंतर न्यायालय परत ऑनलाइन कामकाजाकडे वळले. ऑनलाइन कामकाजात केवळ अत्यावश्यक व तातडीचीच प्रकरणे ऐकली जात आहेत. उच्च न्यायालयाने विविध अडचणींवर मात करून न्यायदानाचे कार्य सुरू ठेवले आहे. परिणामी, कोरोनाकाळात ६ हजार ५४६ प्रकरणे निकाली निघू शकली. याशिवाय, इतर प्रकरणांतील हजारो पक्षकारांना अंतरिम दिलासाही मिळाला.
---------------
एकूण ६१,४०२ प्रकरणे प्रलंबित
कोलारकर यांना देण्यात आलेल्या अन्य माहितीनुसार, या न्यायालयामध्ये २० जुलै २०२१ पर्यंत एकूण ६१ हजार ४०२ प्रकरणे प्रलंबित होती. त्यात ५१ हजार ९०१ दिवाणी, तर ९ हजार ५०१ फौजदारी प्रकरणांचा समावेश होता.