रेल्वे प्रवासात थंडीने चिमुकला बेशुद्ध पडला; ‘आरपीएफ’च्या जवानांमुळे वाचला जीव

By नरेश डोंगरे | Published: December 21, 2023 07:41 PM2023-12-21T19:41:22+5:302023-12-21T19:42:20+5:30

कडाक्याच्या थंडीमुळे चिमुकला क्रिष्णा अस्वस्थ झाला होता.

During the train journey, the little boy fainted due to cold Lives were saved due to RPF jawans | रेल्वे प्रवासात थंडीने चिमुकला बेशुद्ध पडला; ‘आरपीएफ’च्या जवानांमुळे वाचला जीव

रेल्वे प्रवासात थंडीने चिमुकला बेशुद्ध पडला; ‘आरपीएफ’च्या जवानांमुळे वाचला जीव

नागपूर : कडाक्याच्या थंडीमुळे चिमुकला क्रिष्णा अस्वस्थ झाला होता. बोलता येत नसल्याने हा निरागस जीव सहन होईल तो पर्यंत थंडीचा कडाका सहन करीत राहिला. नंतर मात्र बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याची आई कावरीबावरी झाली. मात्र, डब्यातील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान मदतीला धावले अन् बेशुद्ध पडलेल्या चिमुकल्याला त्यांनी लगेच रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीचे उपचार केले अन् सुन्न झालेला क्रिष्णा पुन्हा हसू लागला. रामेश्वरम - अयोध्या एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली.

ट्रेन नंबर २२६१३ रामेश्वरम अयोध्या केंट या गाडीच्या एस-१ मधील ३३ आणि ३६ नंबरच्या बर्थवर दोन महिला मंगळवारी प्रवास करीत होत्या. कडाक्याच्या थंडीत पुरेशे गरम कपडे नसल्याने त्यांनी आपल्या चिमुकल्यांना कसे बसे जवळ घेत मायेची उब देण्याचा प्रयत्न केला. मात्र, निरागस क्रिष्णा नामक चिमुकल्याला गारठ्यामुळे श्वास घेणे कठीण झाले होते. त्याला सांगता-बोलताही येत नव्हते. त्यामुळे क्रिष्णाने सहन करता येईल तेवढे केले अन् तो बेशुद्ध् झाला. तोवर आमला रेल्वे स्थानक आले होते. तो कुशीतील चिमुकला सुन्न पडल्याचे पाहून मातेने आक्रोश केला. तो ऐकून बाजुचे प्रवासी अन् कोचमधील आरपीएफचे एएसआय वीरेश उपाध्याय आणि हवलदार अमित गोहे यांनी लगेच तिकडे धाव घेतली. मातेच्या कुशित गप्प असलेल्या निरागस कृष्णाला त्यांनी गरम कपड्यात गुंडाळून लगेच स्थानकावरच्या रुग्णालयात नेले. डॉ. प्रदीप जैन यांनी चिमुकल्याची तपासणी केली. गारठ्यामुळे चिमुकल्याला निमोनिया झाला होता. त्याला श्वासच घेता येत नसल्याने तो बेशुद्ध झाला होता. त्याचे निदान करून डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. उपचारानंतर शरिराला उब मिळाल्यामुळे काही वेळेतच निरागस क्रिष्णा हसू लागला. पूर्ववत हातपाय हलवू लागला. ते पाहून त्याच्या मातेच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

वरिष्ठांकडून अभिनंदन!
आरपीएफच्या जवानांच्या तत्परतेमुळे चिमुकला क्रिष्णा ठणठणीत झाल्याचे कळाल्यानंतर क्रिष्णाच्या नातेवाईकांसह अनेक प्रवाशांनी त्यांचे काैतुक केले. आरपीएफच्या वरिष्ठांनीही उपाध्याय आणि गोहे या दोघांच्या प्रसंगावधानाची दखल घेत त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: During the train journey, the little boy fainted due to cold Lives were saved due to RPF jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर