वर्षभरात मास्क न वापरणाऱ्या ३६२१९ जणांनी भरला १ .६५ कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:07 AM2021-03-21T04:07:36+5:302021-03-21T04:07:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी गेल्यावर्षी २१ मार्चपासून उपायोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्यांवर मनपाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना प्रतिबंधासाठी गेल्यावर्षी २१ मार्चपासून उपायोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मास्क न वापरणाऱ्यांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई केली जात आहे. सुरुवातीला मास्क न वापरणाऱ्यांवर २०० रुपये दंड आकारला जात होता. परंतु त्यानंतरही संख्या कमी झाली नाही. घराबाहेर पडताना सर्वांनी मास्क वापरावा यासाठी मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात आला. पथकामार्फत दररोज कारवाई केली जात आहे. त्यानंतरही अनेकजण मास्क वापरत नसल्याचे नागपूर शहरातील चित्र आहे. वर्षभरात पथकांनी ३६ हजार २९७ लोकांकडून १ कोटी ६५ लाख ७ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
...
२०० रुपये दंडानुसार ५७७० जणांवर कारवाई
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विना मास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. त्यानुसार ५ हजार ७७० लोकांकडून १० लाख ९४ हजारांचा दंड वसुल करण्यात आला.
....
५०० रुपये प्रमाणे ३६२२१ लोकांवर कारवाई
मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी विनामास्क फिरणाऱ्या ३० हजार ८२७ लोकांकडून १ कोटी ५४ लाख १३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
पथकामार्फत मनपाच्या सर्व झोनमध्ये दररोज कारवाई केली जात आहे.
....
५९ मंगल कार्यालयांना ८.५९ लाखांचा दंड
मंगल कार्यालय, लॉन येथील लग्न समारंभ व कार्यक्रमांत मर्यादेपेक्षा अधिक लोकांची व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५९ मंगल कार्यालय व लॉनवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ लाख ५९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
...
१ जानेवारी ते २० मार्च दरम्यान १० हजार जणांवर कारवाई
शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर एनडीएस पथकाने मास्क न वापऱ्यांच्या विरोधातील कारवाईला अधिक गती दिली. १ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत १० हजार २७७ लोकांकडून ५१ लाख् ३८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
...
कारवाईला गती देण्याचे निर्देश
शहरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार मनपाच्या एनडीएस पथकातर्फे विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते. आजवर ३६ हजारांहून अधिक लोकांवर कारवाई करून १ कोटी ६५ लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला. कारवाई मागे दंड वसूल करण्याचा हेतू नसून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी कोविड-१९ नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा आहे.
वीरसेन तांबे, एनडीएस पथक प्रमुख मनपा