नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या थर्ड एसी वाढणार; प्रवाशांच्या मागणीमुळे निर्णय
By नरेश डोंगरे | Published: February 17, 2023 07:54 PM2023-02-17T19:54:46+5:302023-02-17T19:55:30+5:30
नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसच्या थर्ड एसी वाढणार आहेत.
नागपूर: नागपूर - मुंबई आणि मुंबई - नागपूर दुरंतो एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांकडून थर्ड एसीची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ती पूर्ण करण्यात येणार आहे. १५ जूनपासून नवीन बदलांचा हा निर्णय अंमलात येणार आहे. या नवीन बदलामुळे नागपूरहून मुंबईला येणाऱ्या - जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
नव्या बदलानुसार, या रेल्वेगाडीत आधी एक फर्स्ट एसी, तीन सेकंड एसी होत्या. दोन जनरेटर व्हॅन होत्या. त्या तशाच राहणार आहेत. मात्र, आधी थर्ड एसी ९ होत्या. त्या आता १५ करण्यात येणार आहेत. आधी स्लिपर कोच आठ होते, ते कमी करून आता दोन करण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक १२२९० नागपूर - सीएसएमटी मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये हा बदल १५ जूनपासून लागू होणार असून, गाडी क्रमांक १२२८९ सीएसएमटी मुंबई - नागपूर एक्स्प्रेसमध्ये हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. १७ फेब्रुवारीपासून सर्व बुकिंग केंद्रांवर तसेच रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन बुकिंग (रिझर्वेशन) करता येणार आहे.
उन्हाळ्याच्या अखेरीस काय फायदा ?
एसीची खरी गरज उन्हाळ्यात असते. रेल्वे प्रशासनाने थर्ड एसी वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची अंमलबजावणी १५ जूनपासून होणार आहे. तोपर्यंत उन्हाळा जवळपास संपल्यात जमा असतो. पावसाचे आगमन होत असल्याने उन्हाची तीव्रताही कमी होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस एसी वाढवण्याऐवजी मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केल्यास प्रवाशांना चांगला दिलासा मिळू शकतो.