‘दुर्योधन’ पुनित इस्सर सरसंघचालकांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:23 PM2019-11-13T23:23:21+5:302019-11-13T23:25:12+5:30
महाभारत या पौराणिक मालिकेत गाजलेली दुर्योधनाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक पुनित इस्सर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन दशकापूर्वी गाजलेल्या भव्य अशा महाभारत या पौराणिक मालिकेत गाजलेली दुर्योधनाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेता व चित्रपट दिग्दर्शक पुनित इस्सर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. स्व: लिखित, दिग्दर्शित व अभिनित ‘महाभारत - दी इपिक टेल’ या महानाट्याला आमंत्रित करण्यासाठी, त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. या महानाट्याचे दोन प्रयोग नागपुरात होत आहेत. त्याअनुषंगाने, इस्सर यांनी आग्रहाचे आमंत्रण म्हणून सरसंघचालकांशी भेट घेतली. यावेळी, नाट्य, मालिका आणि चित्रपटांतून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन कशा तऱ्हेने केले जाऊ शकते, या विषयावरही दोघांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही ‘ताश्कंद फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती, रांगडत्त अभिनेता व खासदार सनी देओल यांनीही भेट घेतली होती. गेल्या काही काळात बॉलिवूडला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीची भुरळ पडल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.