पाण्याविना धूळवड!
By admin | Published: March 26, 2016 02:34 AM2016-03-26T02:34:51+5:302016-03-26T02:34:51+5:30
होळी म्हटली की पाणी आलेच ! पाण्याशिवाय होळी खेळण्याची कल्पनाच करता येत नाही.
नागपूर : होळी म्हटली की पाणी आलेच ! पाण्याशिवाय होळी खेळण्याची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच होळीमध्येच लाखो लिटर पाणी वाया जाते. परंतु यंदाचे वर्ष हे भीषण पाणीटंचाईचे आहे. नागपुरात टंचाई नसली तरी राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी स्थिती आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. यावेळी पाण्याची नासाडी होऊ नये म्हणून कोरडी होळी खेळून पाणी वाचवण्यासंबंधी आवाहने करण्यात आली होते. नागपूरकरांनीही याला चांगली साद देत एक आदर्श घालून दिला आहे. शहरात अनेक ठिकाणी गुलालासोबत कोरडी होळी खेळून नागपूकरांनी लाखो लिटर पाण्याची बचत केली. रंगांची उधळणसुद्धा झाली, परंतु त्यासाठी पिण्याचे पाणी न वापरता विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याचा वापर करण्यात आला.
राज्यात इतर भागात दुष्काळ आहे. नागरिकांनाही याची कल्पना आहे. यामुळेच प्रशासनिक स्तरापासून तर सामान्य नागरिकांपर्यंत पाणी वाचवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. नागरिकांना रंग न खेळता गुलालाची कोरडी होळी खेळण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनीही आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडून आदर्श निर्माण केला.
शहरात नेटवर्क परिसरात पाणीपुरवठा करणारी कंपनी ओसीडब्ल्यू आणि नॉन नेटवर्क परिसरात मनपा जलप्रदाय विभागातर्फे पाणीपुरवठा केला जातो. होळीच्या दिवशी एकही टँकर रस्त्यावर धावले नाही. शुक्रवारी नेटवर्क परिसरात टँकरच्या ६५० फेऱ्या आणि नॉन नेटवर्क परिसरात १९०० फेऱ्या झाल्याची माहिती आहे. याच प्रकारे २५५० टँकरच्या फेऱ्या झाल्या. दररोज इतक्याच फेऱ्या टँकर लावत असतात. एका टँकरमध्ये ४ हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असते. यापेक्षा अधिक क्षमतेचे टँकर सुद्धा आहेत. याची बेरीच केली तर लाखो लिटर पाण्याची एकाच दिवशी बचत झाली.