डस्टबिनचा निर्णय कचरापेटीत

By Admin | Published: May 23, 2017 01:43 AM2017-05-23T01:43:52+5:302017-05-23T01:43:52+5:30

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत १ जूनपासून नागपूर शहरातील घराघरातून विलगीकरण केलेला ओला व सुका कचरा संकलित केला जाणार आहे.

Dustbin Decision Trash | डस्टबिनचा निर्णय कचरापेटीत

डस्टबिनचा निर्णय कचरापेटीत

googlenewsNext

मनपाला आली जाग : आता केवळ गरीबांना होणार वाटप, नवा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत १ जूनपासून नागपूर शहरातील घराघरातून विलगीकरण केलेला ओला व सुका कचरा संकलित केला जाणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी महापालिकेने शहरातील सर्व कुटुंबांसह व्यापाऱ्यांनाही मोफत डस्टबिन वाटपाचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर १४ कोटींचा आर्थिक बोजा पडणार होता. परंतु या निर्णयाला विविध स्तरातून विरोध झाला. जनरेट्यामुळे प्रशासनाने नमते घेतले. आता फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांनाच मोफत डस्टबिन देण्यात येणार आहे.
शहरातील सर्व नागरिकांना सरसकट डस्टबिन वाटपाचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यात व्यापारी व श्रीमंतांचाही समावेश होता. यामुळे महापलिकेवर १४ कोटींचा बोजा पडणार होता. महापालिकेची बिकट आर्थिक परिस्थिती विचारात घेता, लोकमतने या निर्णयाविरोधात वृत्तमालिका प्रकाशित केली होती. यावरील चर्चेत शहरातील विविध सेवाभावी संस्था व नागरिकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता. अखेर महापालिका प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली.
१ जूनपासून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानासंदर्भात सोमवारी स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. महापौर नंदा जिचकार, आयुक्त अश्विन मुदगल, वैद्यकीय व आरोग्य विशेष समितीचे सभापती मनोज चापले, अप्पर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या अमृत सिटी योजनेत देशभरातील ४ हजार ४१ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. त्यानुसार आता फक्त विलगीकरण केलेला ओला व सुका कचरा गोळा केला जाणार आहे.
केंद्र सरकाने ५ जून या जागतिक पर्यावरण दिवसापासून हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहे. परंतु नागपूर महापालिकेने १ जूनपासून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

जनजागृतीवर भर देणार
कचरा निर्माण होतो तेथेच ओला व सुका कचरा वेगळा करण्याची गरज आहे. हॉकर्स, हॉटेल, मॉल्स, भाजीबाजार, रेल्वे स्टेशन, सरकारी व खासगी कार्यालये इत्यादी प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी महापालिकेतर्फे जनजागृतीपर पत्रके लावण्यात येणार आहेत. चित्रपटगृहात या अभियानाबाबत जाहिरातपर लघुपट दाखविण्यात येईल. हॉकर्स लोकांना सक्तीने दोन रंगांच्या डस्टबिन ठेवण्याच्या सूचना दिल्या जातील. दररोज रात्री ८ वाजता महापालिका व कनकचे कर्मचारी हा कचरा संकलित करतील, अशी माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली.
नागरिक अभिप्राय नोंदविणार
अभियानाबाबत नागरिकांना त्यांचा अभिप्राय नोंदविण्यासाठी पत्रक ांचे वाटप करण्यात येणार आहे. यावर नागरिकांना योग्य पर्यायावर खूण करायची आहे. यावेळी अभियानात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना महापालिकेतर्फे स्वच्छतादूत म्हणून ओळखपत्र प्रदान करण्यात येईल. यावेळी अभियानाचे सादरीकरण करण्यात आले.

Web Title: Dustbin Decision Trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.