सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण; आता सिमेंटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:29 AM2017-09-13T01:29:10+5:302017-09-13T01:29:10+5:30
महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना गेल्या सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या प्रभाग २३ (अ)मधील हिवरीनगर येथील रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना गेल्या सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेल्या प्रभाग २३ (अ)मधील हिवरीनगर येथील रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. हा रस्ता चांगला होता. त्यावर खड्डे नव्हते. असे असतानाही सिमेंटीकरण केले जात आहे. यात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रभाग २३(ड)चे नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव व आयुक्त अश्विन मुदगल यांच्याकडे केली आहे.
वर्धमाननगरनजीकच्या हिवरी ले-आऊ ट येथे मे. ग्लोबल इंजिनीअरिंग वर्कला अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे ६८ लाखांचे काम देण्यात आले होते. गेल्या मार्च महिन्यात या कामाचे बिल देण्यात आले. यातील एमआयजी कॉलनी ते जयेश किराणा, हनुमान मंदिर ते राजेश अग्रवाल यांच्या घरापर्यंतचे अंतर्गत रस्ते चांगले होते. असे असूनही या रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच या मर्गाच्या दोन्ही बाजूला अगोदरच आयब्लॉक लावण्यात आलेले आहे. त्यावर पुन्हा नवीन ब्लॉक लावले जात आहे.
या रस्त्यांची अवस्था चांगली असताना सिमेंटीकरण कशासाठी केले जात आहे. सिमेंटीकरणामुळे रस्ता उंच व घरे खाली, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी दुनेश्वर पेठे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी महापालिका प्रशासनाला याची माहिती दिली.
महापालिकेच्या निधीचा हा दुरुपयोग असून, या प्रभागातील एका वजनदार नगरसेवकाच्या पुढाकाराने अशी चुकीची कामे होत असल्याची चर्चा आहे.