समाजाच्या उत्थानासाठी डॉक्टरांचे कर्तव्य गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2015 03:01 AM2015-10-19T03:01:57+5:302015-10-19T03:01:57+5:30
वैद्यकीय क्षेत्र हे सेवाभावी क्षेत्र आहे. डॉक्टरांनी समाजाच्या उत्थानासाठी, वंचित व ग्रामीण भागातील लोकांसाठी आपले कर्तव्य, ....
मुख्यमंत्री फडणवीस : आयएमएच्या ‘निमकॉन’ परिषदेचे उद्घाटन
नागपूर : वैद्यकीय क्षेत्र हे सेवाभावी क्षेत्र आहे. डॉक्टरांनी समाजाच्या उत्थानासाठी, वंचित व ग्रामीण भागातील लोकांसाठी आपले कर्तव्य, जबाबदारी योग्यरीत्या पार पाडणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नागपूर शाखेच्यावतीने रविवारी ‘निमकॉन-२०१५’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंचावर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी, आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. टी.सी राठोड, आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. अजय काटे, सचिव डॉ. सरिता उगेमुगे, डॉ. अविनाश वासे, डॉ. सुभाष ढवळे, डॉ. आशिष दिसावाल उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉक्टरांचा ओढा हा शहरी भागाकडे अधिक आहे. यामुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांना सुरुवातीचा काही काळ ग्रामीण भागामध्ये सेवा करणे अनिवार्य आहे. ग्रामीण भागात जायचे नसेल तर त्या डॉक्टरना बॉण्डची रक्कम शासनाकडे भरावी लागते. मात्र, असे असतानाही ग्रामीण भागांमध्ये जाऊन सेवा देण्यास बहुसंख्य डॉक्टर तयार नाहीत.
वैद्यकीय सुविधा केवळ शहरापुरतीच मर्यादित न राहता ती ग्रामीण भागापर्यत पोहचविण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. जोपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार नाही, तोपर्यत आपण सशक्त समाज निर्माण करू शकणार नाही, याकडे आयएमएने लक्ष द्यावे. एम्ससारखी संस्था नागपूर येथे निर्माण होत असल्यामुळे त्याचा लाभ विदभार्सोबतच इतर राज्यातील नागरिकांनासुद्धा होईल. आयएमए ही संस्था देशातील अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेने माफक दरात वैद्यकीय सोयी उपलब्ध करून देण्यास पुढाकार घ्यावा.
डॉ. टावरी म्हणाले, डॉक्टरांमध्ये सामजिक बांधिलकीची जोड नसले तर ते चांगले डॉक्टर म्हणून कधीही आपले नाव कमावू शकणार नाही. म्हणूनच प्रत्येक वैद्यकीय डॉक्टरांनी स्वयंशिस्त होऊन नैतिकेने व्यवसाय करावा. डॉक्टरांकडून समाजाच्या अपेक्षा पूर्ण होणे आवश्यक आहे.
पाहुण्यांचा परिचय डॉ. अल्का मुखर्जी यांनी करून दिला. प्रास्ताविक डॉ. अजय काटे यांनी केले. संचालन डॉ. गौरी अरोरा आणि डॉ. समीर जहागीरदार यांनी केले. कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. सुधीर गुप्ता, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. बी.के. शर्मा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. संजय देशपांडे, डॉ. कुश झुनझुनवाला आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राणी बंग यांचा सत्कार
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांना आयएमएतर्फे दरवर्षी ‘डॉ. वानकर स्मृती लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड’ने सन्मानित केले जाते. या वर्षी ‘निमकॉन’ या परिषदेत ज्येष्ठ समाजसेविका डॉ. राणी बंग यांना हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.