समाजाने कर्तव्यभावना जपावी
By Admin | Published: March 11, 2017 02:30 AM2017-03-11T02:30:03+5:302017-03-11T02:30:03+5:30
देशासाठी हवालदार वीर हंगपन दादाने छातीवर गोळ्या झेलून शहिदत्व मिळविले.
न्यायमूर्ती विकास सिरपूरकर : वीरपत्नी चासेन लोवांग यांचा सन्मान
नागपूर : देशासाठी हवालदार वीर हंगपन दादाने छातीवर गोळ्या झेलून शहिदत्व मिळविले. त्याच्या कुटुंबाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. प्रहार संस्थेने जी संवेदना या कुटुंबाच्या बाबतीत दाखविली, अशीच कर्तव्यभावना सैनिकाप्रती समाजाने जपावी, अशी भावना न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केली.
जम्मू काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमधील लष्करी तळावर आतंकवाद्यांना पकडण्याची जबाबदारी सोपविल्यानंतर आतंकवाद्यांशी चार हात करताना ३५ राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार हंगपनदादा शहीद झाले. मरणोपरांत त्यांना अशोकचक्र प्रदान करण्यात आले. या शहीद जवानाची वीरपत्नी चासेन लोवांग हिचा गौरव प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे शुक्रवारी रेशीमबागच्या स्मृती मंदिरातील महर्षी व्यास सभागृहात करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी लेफ्टनन जनरल रवींद्र थोडगे, ब्रिगेडियर सुनील वझे, कर्नल सुनील देशपांडे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते वीरपत्नी चासेन लोवांग यांना प्रहारचे स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
ब्रिगेडियर सुनील वझे म्हणाले, भारतीय सेना देशभक्तीचे उत्तम उदाहरण आहे. येथे वेगवेगळ्या प्रांतातून, धर्मातून लोक एकत्र येतात आणि देशासाठी बलिदान देतात. बंधुभाव व देशभक्ती बघायची असेल तर ती सेनेतच दिसते. त्यामुळे सेनेला वर्षातून दोन दिवस आठवू नका, सेनेप्रति निष्ठा ठेवा. लेफ्टनन जनरल रवींद्र थोडगे म्हणाले देशासाठी लढताना आम्हाला फक्त शत्रू दिसतात. कुटुंबाचाही विसर पडतो. पण तो जेव्हा निवृत्त होऊन आपल्या शहरात, गावात येतो, त्याला तो सन्मान मिळत नाही. सैनिकाचा सन्मान समाजाबरोबर शासनानेही केल्यास त्यांची देशसेवेची फलश्रृती ठरेल. या कार्यक्रमात प्रहार मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर नृत्य गीत सादर केली. संचालन फ्लार्इंग आॅफिसर (निवृत्त) शिवाली देशपांडे यांनी केले. (प्रतिनिधी)
देशविरोधी नारे देणारे ‘ब्लफ बॉईज’
मानवधिकाराच्या नावाखाली सैनिकांवर जे ताशेरे ओढतात. ज्यांना बंदुकीचा ब व गोळीचा ग सुद्धा महिती नाही, ते मोठमोठ्या चर्चा करतात. अशा अमानविय लोकांना कसली आली मानवता. एकीकडे देशाचे सैनिक प्राणपणाला लावतात. दुसरीकडे आजची तरुण पिढी देशविरोधी नारे लावतात. त्यांच्यावर टीका केल्यास ‘फ्री स्पीच’चा दाखला देतात. देशाप्रती अशा भावना ठेवणारे हे तरुण ‘ब्लफ बॉईज’ असल्याचे न्यायमूर्ती शिरपूरकर म्हणाले.