पृथ्वी कर्तव्य म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:27 PM2018-08-30T23:27:10+5:302018-08-30T23:28:57+5:30
पाण्याचे दुर्भिक्ष्य आज आपल्याला जाणवत आहे. लवकरच हवेच्या बाबतीतही अशीच अवस्था निर्माण होणार आहे. कारण वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे टाळायचे असेल तर विकासाच्या नावावर झाडाच्या होणाऱ्या अवैध कत्तली थांबल्या पाहिजेत. नाहीतर या देशाच्या प्रत्येक व्यक्तीने मातृपितृ कर्तव्यासारखेच पृथ्वी कर्तव्य म्हणून एक झाड लावले पाहिजे, असे मत माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाण्याचे दुर्भिक्ष्य आज आपल्याला जाणवत आहे. लवकरच हवेच्या बाबतीतही अशीच अवस्था निर्माण होणार आहे. कारण वायू प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. हे टाळायचे असेल तर विकासाच्या नावावर झाडाच्या होणाऱ्या अवैध कत्तली थांबल्या पाहिजेत. नाहीतर या देशाच्या प्रत्येक व्यक्तीने मातृपितृ कर्तव्यासारखेच पृथ्वी कर्तव्य म्हणून एक झाड लावले पाहिजे, असे मत माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी व्यक्त केले.
वनराई फाऊंडेशन नागपूर तर्फे डॉ. मोहन धारिया स्मृती पर्यावरण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवारी शंकरनगरातील धनवटे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. विकास सिरपूरकर यांच्याहस्ते ऋतुध्वज ऊर्फ बाबा देशपांडे व प्रा. अलोक शेवडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाबुराव तिडके, प्रमुख अतिथी नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्यासह अनंतराव घारड, समीर सराफ, अजय पाटील, अनिल राठी, विकास खिंचा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. राकेश कुमार म्हणाले की, पर्यावरणाला आयुष्य समर्पण करण्याची वृत्ती राहिलेली नाही. त्यामुळे हजारो वर्षापासून जी इकोसिस्टीम बनलेली आहे, ती नष्ट होत आहे. परंतु शासनाने आता त्याला गंभीरतेने घेतले आहे. कुठल्याही प्रकल्पाच्या निर्मितीपूर्वी जसा गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला जातो. तसा तेथील इकोसिस्टीमचाही अहवाल मागविला जातो. प्रसंगी बाबुराव तिडके म्हणाले की, एकीकडे झाडे जगविण्याची जी धडपड बाबा देशपांडे करीत आहे, दुसरीकडे वन नष्ट केली जात आहे. त्याचे परिणाम आपण भोगतो आहे. सत्काराला उत्तर देताना प्रा. आलोक शेवडे म्हणाले की, कीटकांचे सौंदर्यात्मक बाजू मांडणे माझा छंद आहे. कीटकाने मला जगाच्या पाठीवर पाऊल ठेवण्याची संधी दिली आहे. बाबा देशपांडे यांनी वृक्षाचे संवर्धन ही माझी पॅशन आहे. ७३ वर्षाचा असतानाही वनराईच्या मिळालेल्या साथीमुळे आणखी काम करायचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन नितीन जतकर यांनी केले. आभार नीलेश खांडेकर यांनी मानले.