द्वारकानाथ संझगिरी यांनी उलगडली लतादीदींची ‘अनकहीं दास्तान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 07:10 AM2022-03-03T07:10:00+5:302022-03-03T07:10:02+5:30
'शब्दांना स्वरांची पालखी मिळाली तर अत्यानंद होतो आणि तेव्हा शब्द आणि स्वरांचे द्वंद्व संपलेले असते... ' अशा वाक्याने सुरुवात करत प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी लतादीदींविषयीच्या अनेक बाबी उलगडून सांगितल्या.
नागपूर : शब्दांना स्वरांची पालखी मिळाली तर अत्यानंद होतो आणि तेव्हा शब्द आणि स्वरांचे द्वंद्व संपलेले असते... अशा वाक्याने सुरुवात करत प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी लतादीदींविषयीच्या अनेक बाबी उलगडून सांगितल्या. शेवाळकर कुटुंबीयांच्या वतीने कीर्तनकेसरी भाऊसाहेब उपाख्य राम शेवाळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बुधवारी शेवाळकर हाऊस येथे ‘याद-ए-लता’ हा ऑडिओ व्हिज्युअल बायोग्राफिक कार्यक्रम पार पडला.
द्वारकानाथ संझगिरी यांनी यावेळी वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून अवघ्या पाच-सहा वर्षाच्या हाती मिळालेला तंबोरा आणि संगीताचे धडे, एका भिकाऱ्याचे गायन ऐकून ओशाळलेले दीनानाथ, त्यांचे ‘माझेही एक-दोनच दिवस उरले’ हे वक्तव्य, त्यांचा मृत्यू आणि अंत्यसंस्काराला न आलेले कोणी, त्यानंतर लतादीदींचा सुरू झालेला प्रवास आदींवर प्रकाश टाकला. त्यांचे ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटातील पहिले गाणे, ‘आपके सेवा में’ या हिंदी चित्रपटातील पहिले गाणे कसे मिळाले, लंडन येथील अल्बर्ट हॉलमध्ये झालेला पहिली भारतीय गायिका म्हणून लतादीदींचा कार्यक्रम आणि तोपर्यंतच्या काळात प्रथमच हाऊसफुल झालेला इतिहास आदी इतिहासकालीन गोष्टी संझगिरी यांनी उलगडल्या.
यासोबतच गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश, अनिल बिश्वास, सज्जाद हुसैन यांच्याबरोबरचे त्यांचे गुरू-शिष्याचे नाते आणि त्यांचे एकमेकांबाबतचे मत, यावरही संझगिरी व्यक्त झाले. ‘कल्पवृक्ष, कन्येसाठी लावूनिया बाबा गेला, याल का हो बाबा भेटायला’ हे गाणे गाताना लतादीदींच्या मनाची झालेली घालमेल आणि त्यांचे बेशुद्ध पडण्यासारख्या घटनाक्रमांना उजाळा देत लतादीदीच्या स्वरांवर झालेले संशोधन अशा एक ना अनेक बाबींची माहिती संझगिरी यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी, गिरीश गांधी व आशुतोष शेवाळकर यांच्या हस्ते द्वारकानाथ संझगिरी यांचे स्वागत करण्यात आले. रेणुका देशकर यांनी संचालन केले.
........