दयाशंकर तिवारी यांची पोलीस कर्मचाºयांना अर्वाच्य शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:54 AM2017-09-12T00:54:42+5:302017-09-12T00:55:08+5:30
भाजपा नेत्यांच्या दादागिरीचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री पुन्हा यात भर पडली.
गणेशपेठ पोलीस स्टेशन परिसरातील घटना : पोलिसात असंतोष; राष्ट्रवादीची कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपा नेत्यांच्या दादागिरीचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री पुन्हा यात भर पडली. महापालिकेतील माजी सत्तापक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस कर्मचाºयांना धमकी देत शिवीगाळ केली. घटनेच्यावेळी महिला पोलीस कर्मचारी हजर होत्या. विशेष म्हणजे तिवारी शिवीगाळ करीत असताना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या एका जागरूक महिला कर्मचाºयाने याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटींग केले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपा नेत्यांची मनमानी उघडकीस आली
व्हायरल झालेल्या व्हिडिओत तिवारी हे कशाप्रकारे वाद घालत आहेत. ड्युटीवरील पोलीस कर्मचाºयांना धमकावत आहेत. तसेच शिवीगाळ करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावेळी महिला उपस्थित असल्याचेही त्यांना भान नव्हते. रात्री उशिरापर्यंत आपण पोलिसांची मदत करीत असतो. मात्र पोलीस आपल्यालाच मदत करीत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे ‘लोकमत’कडे हा व्हायरल झालेला व्हिडिओ उपलब्ध आहे. एखादा लोकप्रतिनिधीच पोलिसांसोबत असा व्यवहार करीत असेल तर यावर अनेक प्रश्न निर्माण होतात.
होय, मी शिवीगाळ केली : दयाशंकर तिवारी
वैभव दीक्षित या विद्यार्थ्याला वाहतूक पोलिसांनी दारूच्या नशेत काठीने मारहाण केली. यात त्यांचे डोके फुटले होते. परंतु त्याला रुग्णालयात उपचारासाठी न नेता पोलीस स्टेशनमध्ये दोन तास बसवून ठेवले. यामुळे मी संतप्त झालो. रागाच्या भरात माझ्या तोंडून काही अपशब्द निघाले. यासाठी मी क्षमा मागतो. मारहाण करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी किशोर रमेश जाधव आहे. तो दारू प्यायला होता. ड्युटी आॅफिसर कांडेकर यांनीही असभ्य वर्तन केले. जाधव यांची मेयो रुग्णालयात तपासणी केली असता जाधव दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले.
विनाकारण काठीने मारले, वडिलांना अटक करण्याची धमकी : वैभव
रविवारी रात्री मोक्षधाम घाट चौकात ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह मोहिमेवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी किशोर जाधव याने काठीने मारहाण केल्याचा दावा महाविद्यालयीन विद्यार्थी वैभव दीक्षित यांनी केला आहे. मित्रासोबत बजेरिया येथून मेडिकल चौकाकडे जात होतो. मोक्षधाम चौकात तैनात साध्या वेषातील एका पोलीस कर्मचाºयाने विनाकरण डोक्यावर व खांद्यावर काठीने मारले. त्यानंतर दारू प्यायले आहे का अशी विचारणा केली. परंतु तपासणी केली असता दारू पिले नसल्याचे निदर्शनास आल्याने निघून जाण्यास सांगितले. वडिलांना बोलवतो, असे म्हटल्यानंतर तैनात पोलीस कर्मचाºयांनी वडिलांना अटक करण्याची धमकी दिली. गणेशपेठ पोलीस स्टेशनला दोन तास बसवून ठेवले. संबंधित पोलिसांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. मेयो,मेडिकल रुग्णालयात तपासणी केली असता पोलीस कर्मचारी दारू प्यायल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वैभव दीक्षित यांनी दिली. दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी शहर अध्यक्ष नूतन रेवतकर यांनी पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांच्याकडे तक्रार करून तिवारी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.