डिस्लेक्सियाग्रस्तांची पुणे, मुंबईवारी बंद!
By admin | Published: February 6, 2016 03:16 AM2016-02-06T03:16:16+5:302016-02-06T03:16:16+5:30
डिस्लेक्सियाग्रस्त व्यक्तीला अक्षर ओळख करण्यात अडचण येते. इतरांच्या सहजपणे लक्षात राहणारी अक्षरे त्याला वेडीवाकडी दिसतात, नाचत आहेत असे वाटते.
नागपुरातच मिळणार प्रमाणपत्र : मेडिकलमध्ये सुरू होत आहे ‘अध्ययन अक्षमता केंद्र’
सुमेध वाघमारे नागपूर
डिस्लेक्सियाग्रस्त व्यक्तीला अक्षर ओळख करण्यात अडचण येते. इतरांच्या सहजपणे लक्षात राहणारी अक्षरे त्याला वेडीवाकडी दिसतात, नाचत आहेत असे वाटते. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. वर्गात तो ‘ढ’ किंवा मूर्ख समजला जातो. अशा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु हा आजार असल्याचे प्रमाणपत्र राज्यात केवळ पुणे व मुंबई येथील ‘अध्ययन अक्षमता केंद्रा’त मिळायचे. परिणामी, प्रमाणपत्राअभावी अशी मुले मागे पडायची. आता हेच प्रमाणपत्र मेडिकलच्या मानसिक रोग विभागातूनही मिळणार आहे. या विभागात लवकरच हे केंद्र’ सुरू होत आहे.
‘डिस्लेक्सिया’ हा शब्द आमीर खान आणि अमोल गुप्ते यांच्या ‘तारे जमीनपर’ या चित्रपटातून लोकांसमोर आला. अनेकांना या विकाराची माहिती झाली. डिस्लेक्शिया या अवस्थेत मेंदूचा डावा भाग पुरेसे काम करत नाही किंवा त्या भागातील संदेश उजव्या भागाकडे वहन करून नेणारे मज्जातंतू पुरेसे कार्यक्षम नसतात. यामुळे ही बाधा झालेल्या व्यक्तीला अक्षर ओळख करण्यात अडचण येते. सामान्य माणसाला पटकन समजणारी अक्षरे त्याला वेडीवाकडी दिसतात, नाचत आहेत असे वाटते. त्यातला फरक त्यांना ओळखू येत नाही. शब्दांची रचना त्याच्या लक्षात रहात नाही. त्यामुळे काहीही लिहिताना तो वेगवेगळ्या असंख्य चुका करतो. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. वर्गात तो ‘ढ’ किंवा मूर्ख समजला जातो. हा विकार वेळीच ओळखता आल्यास व त्याला तज्ज्ञाकडून ट्रेनिंग दिल्यास या विकारांची मुले आपल्या असामान्य बुद्धीमत्तेचे धनी होऊ शकतात. परंतु चित्रपट विस्मृतीत जाताच हा विकारही विस्मृतीत गेला. विशेष म्हणजे, या आजाराच्या रुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजना आहेत. परंतु याचा फायदा पुणे, मुंबईच्याच रुग्णांना मिळत होता. कारण या ठिकाणच्या इस्पितळातच ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू आहे. येथेच रुग्णांची चार ते पाच वेळा तपासणी करून हा आजार असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
याला घेऊन २०१५ मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. १ फेब्रुवारी २०१६ मध्ये यावर उच्च न्यायालयाने निर्णय देत सर्व जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता हे केंद्र मेडिकलच्या मानसिक रोग विभागात लवकरच सुरू होत आहे. परिणामी, अशा रुग्णांची पुणे, मुंबईवारी बंद होणार आहे.
केंद्र सुरू करण्यासाठी पद मिळणार
मेडिकलच्या मानसिक रोग विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. मनीष ठाकरे यांनी सांगितले, हे केंद्र सुरू करण्यासाठी स्वतंत्र मानसोपचारतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ आणि विशेष शिक्षक अशा तीन पदांची गरज असते. या संदर्भातील प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वीच पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर होण्याची शक्यता असून केंद्र सुरू होईल. मध्यभारतात हे पहिले केंद्र असणार आहे.
डिस्लेक्सियाग्रस्तांसाठी विविध योजना
डिस्लेक्सियाग्रस्तांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या आजाराचे प्रमाणपत्र असलेल्या मुलांना परीक्षेत जास्त वेळ दिला जातो. शाळेत विशेष शिक्षक दिले जातात. अभ्यासात जे विषय खूपच कठीण वाटतात त्या विषयाची सूट दिली जाते. अशा मुलांच्या आई-वडिलांना करातून सूट मिळते. नोकरी बदलीचे नियमही शिथील होतात.
शाळांमध्ये अशा मुलांचा शोध घेतला जाईल
उपराजधानीतील शाळेच्या एका वर्गातील ४० विद्यार्थ्यांमधून सुमारे तीन विद्यार्थी ‘डिस्लेक्सिया’ या विकाराने ग्रस्त आहेत. परंतु याची माहिती अनेकदा पालकांना किंवा शिक्षकांना राहत नाही. ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू झाल्यानंतर शाळा-शाळांमध्ये या केंद्रातील चमू जाऊन अशा मुलांचा शोध घेतला जाईल. तपासणीत आढळून आलेल्या डिस्लेक्सियाग्रस्तांना त्याच शाळेत विशेष शिक्षक ठेवण्याची विनंती केली जाईल. यामुळे त्या मुलाचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होऊ शकेल.
-डॉ. मनीष ठाकरे,
सहयोगी प्राध्यापक मानसिक रोग विभाग, मेडिकल.