१३ दिवसांत २० हजार दुचाकीस्वारांवर ‘ई’ कारवाई
By admin | Published: October 21, 2016 02:41 AM2016-10-21T02:41:34+5:302016-10-21T02:41:34+5:30
उपराजधानीत आता विना हेल्मेट वाहन चालविणे शक्य नाही. ‘ई-चालान’ प्रणालीमुळे जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई होत आहे.
हेल्मेट सक्तीला वेग : आता चौकाचौकांत राबणार विशेष मोहीम
नागपूर : उपराजधानीत आता विना हेल्मेट वाहन चालविणे शक्य नाही. ‘ई-चालान’ प्रणालीमुळे जास्तीत जास्त वाहनांवर कारवाई होत आहे. परिणामी १३ दिवसांत १९ हजार ९२१ वाहनचालकांना ‘ई-चालान’ पाठविण्यात आले. यातच गुरुवारपासून चौकाचौकांमध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात आली. पहिल्याच दिवशी तीन हजारावर वाहनचालक दोषी आढळले.
दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. उपराजधानीत याची सक्ती आठ फेब्रुवारीपासून करण्यात आली. एकाच दिवशी सात हजारावर वाहनचालकांवर कारवाई झाली. परंतु हेल्मेटविषयी जनजागृती न करता व हेल्मेट विकत घेण्यास मुदत न दिल्याने याला विरोध झाला. दरम्यानच्या काळात वाहतूक पोलीस विभागाने सक्तीची कारवाई शिथिल केली होती. परंतु नंतर कारवाईचा वेग वाढविण्यात आला. मात्र यात विनाहेल्मेट वाहनचालकांना थांबविल्यानंतर अनेकवेळा वाद व्हायचा. चालान फाडून शुल्क आकारण्यापर्यंत वेळ जायचा. यावर उपाययोजना म्हणून ६ आॅक्टोबरपासून ‘ई-चालान’ सुरू करण्यात आले. या प्रणालीत विना हेल्मेट दुचाकीस्वाराचा त्याच्या नंबरप्लेटसह फोटो काढला जातो. नंतर ते चालान त्याच्या घरी पाठविल्या जाते. यामुळे आता जास्तीतजास्त वाहनांवर कारवाई करणे शक्य झाले आहे.(प्रतिनिधी)