तलाठीच्या परीक्षेसाठी ‘ई-आधार’ नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:38 PM2019-07-02T21:38:42+5:302019-07-02T21:39:54+5:30
मंगळवारी नागपुरात तलाठी या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना आधार कार्ड आणणे गरजेचे होते. काही उमेदवारांनी आधारकार्ड न आणता, ई-आधारावरून प्रिंट काढून परीक्षा नियंत्रकाला दिली. पण ई-आधारकार्ड चालत नसल्याचे सांगून, आधार कार्डची मूळ प्रत असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही, असे सांगून त्यांना परत पाठविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी नागपुरात तलाठी या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना आधार कार्ड आणणे गरजेचे होते. काही उमेदवारांनी आधारकार्ड न आणता, ई-आधारावरून प्रिंट काढून परीक्षा नियंत्रकाला दिली. पण ई-आधारकार्ड चालत नसल्याचे सांगून, आधार कार्डची मूळ प्रत असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही, असे सांगून त्यांना परत पाठविले.
भुसावळ येथून परीक्षा देण्यासाठी आलेले अक्षय सपकाळे हे परीक्षा देण्यासाठी आले होते. प्रवासात मूळ कागदपत्रे हरवू नये म्हणून त्यांनी कागदपत्राच्या झेरॉक्स आणल्या होत्या तर आधार कार्ड ई-आधारवरून काढून त्याची प्रिंट परीक्षा नियंत्रकाला दाखविली. मात्र त्यांनी ई-आधार स्वीकारले नाही. त्यांनी नायब तहसिलदारांना सुद्धा ही बाब सांगितली पण त्यांनीही मान्य केली नाही. अक्षयसारखे विविध जिल्ह्यातून आलेले काही परीक्षार्थ्यांना सुद्धा आधारकार्डची मूळ प्रत नसल्याने परीक्षेपासून वंचित रहावे लागले.
परीक्षार्थींनी आक्षेप घेतला की, केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत, एमपीएससीच्या परीक्षेत ई-आधार मान्य केल्या जाते. मग महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत का नाकारण्यात येत आहे. एकीकडे सरकार डिजिटल इंडियाकडे वाटचाल करीत आहे. अशात ई-आधार दिल्यास का नाकारण्यात येत आहे. आधारकार्डची मूळ प्रत आणि ई-आधारमध्ये काय फरक आहे, असाही सवाल परीक्षार्थींनी केला.