शहरात धावणार ‘ई-आॅटो’
By admin | Published: September 7, 2015 02:54 AM2015-09-07T02:54:04+5:302015-09-07T02:54:04+5:30
इंधनाची मागणी भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते.
सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
इंधनाची मागणी भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागू शकते. कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी बॅटरीवरील वाहनांचा विकास आणि वापर यासाठी आता शासनाने पुढाकार घेतला आहे. नागपुरात तीन आॅटोरिक्षांना बॅटरीवर चालविण्यासाठी प्रायोगिक स्तरावर ‘मिनिस्ट्री आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अॅण्ड हायवे’ (एमओआरटीएच) मंजुरी दिली आहे. ‘ई-रिक्षा’सोबतच आता ‘ई-आॅटो’मुळे नागपुरातील प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
देशातील इंधनाची वाढती मागणी आणि प्रदूषणामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी २०२० पर्यंत सुमारे ७० लाख हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आणण्याची केंद्र सरकारची योजना आहे. याचा मुख्य उद्देश भारताची खनिज तेल आणि इंधनावर असणारे अवलंबित्व कमी करणे व त्यावर होणारा मोठा खर्च कमी करणे हा आहे. बॅटरी व पेट्रोल किंवा डिझेलवर संयुक्त चालणारी, अशी हायब्रीड वाहनांमध्ये नागपुरात कार व दुचाकीच्या माध्यमातून दिसून येत आहे. तर केवळ बॅटरी आॅपरेटेडमध्ये ‘ई-रिक्षा’ नागपुरात धावत आहे. आता यात आॅटोरिक्षांची भर पडणार आहे. १० सप्टेंबर ते ३० डिसेंबर पर्यंत तीन आॅटोरिक्षांना प्रायोगिक स्तरावर चालविण्यासाठी ‘मिनिस्ट्री आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अॅण्ड हायवे’ने (एमओआरटीएच) याला विशेष मंजुरी दिली आहे. हे आदेश परिवहन सचिवांकडून परिवहन आयुक्तांना देण्यात आले असून या संदर्भातील सूचना नागपूर शहर आरटीओला नुकत्याच मिळाल्या आहेत. या आॅटोरिक्षा शहरातील एका महाविद्यालयाने विकसित केल्या आहेत.
प्रदूषणाची पातळी कमी होईल
नागपूरसारख्या गजबजलेल्या शहरात १४ लाख वाहने रस्त्यावर धावत असल्याने प्रदूषणाची पातळी नेहमीच उच्चांकी असते. त्यामुळे, पर्यावरणपूरक आणि 'झिरो पोल्युशन' करणाऱ्या ‘ई-आॅटोरिक्षा’ला अंतिम मंजुरी मिळाल्यास नागपूर आदर्श शहर ठरण्याची शक्यता आहे. यातील आव्हाने ही प्रचंडे आहेत. परंतु ही एक काळाची गरज नक्कीच आहे. सरकारने या दिशेने पावले उचलली आहेत. परंतु त्याचा पाठपुरावा आणि अंमलबजावणी जरुरी असल्याचे परिवहन खात्यातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
असे आहे बॅटरी आॅटोरिक्षा
आॅटोरिक्षामधील पेट्रोलवर चालणारे इंजिन काढून बॅटरी आॅपरेटेड इंजिन लावण्यात आले आहे. अॅटोमोटिव्ह रिसर्च सेंटर (एआरआय) पुणे यांच्याकडून प्रायोगिक स्तरावर धावणाऱ्या या आॅटोरिक्षाची तपासणी करण्यात येईल. यात टायर, बॅटरी, इंजिनची क्षमता, सुरक्षितता, किती वजन घेऊन आॅटो धावू शकतो अशा विविध स्तरावर तपासणी होईल. त्यानंतरच एआरआयची अंतिम मंजुरी मिळेल.