रामटेक तालुक्यात ‘ई-पीक पाहणी’ अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:08 AM2021-09-13T04:08:24+5:302021-09-13T04:08:24+5:30

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शासनाने राज्यभर ‘ई पीक पाहणी’ अभियान राबविले असून, यात रामटेक तालुक्याचाही समावेश ...

'E-crop survey' incomplete in Ramtek taluka | रामटेक तालुक्यात ‘ई-पीक पाहणी’ अपूर्ण

रामटेक तालुक्यात ‘ई-पीक पाहणी’ अपूर्ण

Next

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शासनाने राज्यभर ‘ई पीक पाहणी’ अभियान राबविले असून, यात रामटेक तालुक्याचाही समावेश आहे. यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची संपूर्ण माहिती या ‘ई-पीक पाहणी ॲप’वर नमूद करायची आहे. दुसरीकडे, शासनाने आधारभूत किंमत धान खरेदी याेजनेंतर्गत धान विक्रीसाठी नाेंदणी करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. ही नाेंदणी करण्यासाठी आधी ‘ई-पीक पाहणी ॲप’वर माहिती नमूद करणे अत्यावश्यक आहे. ‘ई-पीक पाहणी’ अभियान रामटेक तालुक्यात अद्याप पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे नाेंदणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना खरीप हंगाम २०२१-२२ मधील शासकीय आधारभूत किंमत धान, भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत करावयाच्या पूर्वतयारीचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार खरीप हंगाम २०२१-२२ मधील धान खरेदीसाठी ३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या काळात त्यांनी ‘एनईएमएल पोर्टल’वर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी. ही नोंदणी करताना शेतकऱ्यांकडून नवीन सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स घेण्यात यावी. त्यानुसार नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी दिलेले बँक खाते क्रमांक सुरू असल्याची आधी खातरजमा करावी. जनधन योजनेचे बँक खाते क्रमांक शेतकऱ्यांकडून घेऊ नयेत. मागील हंगामात धान खरेदी केंद्रांना जोडण्यात आलेल्या गावातील शेतकऱ्यांची गावनिहाय नोंदणी करण्यात यावी. हंगाम २०२१-२२ अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजना यशस्वीपणे राबविण्याकरिता ऑनलाइन नोंदणी विहित मुदतीत पूर्ण करावी, असे निर्देश महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह व मार्केटिंग फेडरेशनच्या नागपूर जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व संस्थांना दिले आहेत. याबाबत जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबरला सर्व संस्थांना पत्राद्वारे कळविले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट काे-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या आदेशान्वये जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सर्व खरेदी केंद्रांना ८ सप्टेंबर राेजी पत्राद्वारे कळविले आहे. यात नाेंदणीची तारीख ३ ऑगस्ट असल्याचे नमूद केले आहे. नाेंदणी झाली नाही तर खरेदी केंद्र जबाबदार असेल, असेही या पत्राद्वारे कळविले आहे. आता शेतकऱ्यांकडे नवीन सातबारा नाही. त्यामुळे नाेंदणी कशी हाेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ‘ई-पीक पाहणी ॲप’वर माहितीच नमूद केली नाही. शेतातील धान निसवायचे आहे. मग शासन नाेंदणी करण्यासाठी का घाई करीत आहे, असा प्रश्नही काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

..

अंतिम तारीख ३० सप्टेंबर

रामटेक तालुक्यातील बहुतांश शेतकरी त्यांच्याकडील धान दरवर्षी शासनाच्या खरेदी केंद्रावर नेऊन विकतात. त्यासाठी संबंधित शेतकरी आधी नाेंदणीही करतात. त्यासाठी लागणारी कागदपत्रेही सादर करतात. नाेंदणी केल्यानंतर ठरवून दिलेल्या तारखेला शेतकरी या केंद्रावर धान विक्रीसाठी नेतात. पूर्वी ही नाेंदणी ‘एनईएमएल पाेर्टल’ केली जायची. कर्मचारी ही संपूर्ण प्रक्रिया करवून द्यायचे. हीच प्रक्रिया याही वर्षी करावी लागणार आहे. मात्र, ‘ई-पीक पाहणी ॲप’वर माहिती नमूद केल्याशिवाय या पाेर्टलवर नाेंदणी केली जात नाही. ही नाेंदणी ३० सप्टेंबरपर्यंत करावयाची आहे.

...

मुदतवाढ द्यावी

ही नाेंदणी ३० सप्टेंबरपर्यंत करणे शक्य नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. ‘ई-पीक पाहणी ॲप’ वापरण्यात अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील पीक पेरा स्वतःलाच या ॲपवर नमूद करावयाचा आहे. हे ॲप हाताळताना अनेक अडचणी येत आहेत. अनेकांकडे स्मार्ट माेबाइल फाेन नाहीत. शेतात जाऊन शेताचा फोटो काढून ते अपलोड करावे लागतात. शेतात व दुर्गम भागात नेटवर्कची समस्या असल्याने फाेटाे अपलाेड हाेत नाही. शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदवण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या अडचणींच्या पार्श्वभूमीवर तलाठ्यांनी शेतकऱ्यांचा पीक पेरा नोंदवावा व सातबारा शेतकऱ्यांना द्यावा तसेच याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

...

Web Title: 'E-crop survey' incomplete in Ramtek taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.