विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ‘ई-शिक्षा’; नागपूर विद्यापीठाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:19 PM2020-04-25T12:19:16+5:302020-04-25T12:19:52+5:30
ऐन परीक्षेच्या अगोदर अशी स्थिती उद्भवल्याने अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांमध्येदेखील चिंता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रत्येक विषयाचे धडे त्यांना मिळावे यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सर्वच महाविद्यालयांत मागील महिनाभरापासून कुठलेही वर्ग झालेले नाहीत. ऐन परीक्षेच्या अगोदर अशी स्थिती उद्भवल्याने अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांमध्येदेखील चिंता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व प्रत्येक विषयाचे धडे त्यांना मिळावे यासाठी नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. ई-शिक्षा नावाचे विशेष पोर्टल सुरू करण्यात आले असून येथे त्यांना विद्यार्थ्यांसाठी लेक्चर्स, ऑनलाईन कन्टेंट घरूनच अपलोड करता येणार आहे.
लॉकडाऊन लागू होताच सर्व संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांना सुटी देण्यात आली. तसेच प्राध्यापकांनी घरूनच काम करावे, असे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले. घरी असताना विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कंटेंट तयार करण्यावर भर देण्याची सूचनादेखील प्रशासनाकडून करण्यात आली. काही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी घरूनच ऑनलाईन धडे देण्यास सुरुवात केली. शिवाय ऑनलाईन परीक्षादेखील घेण्यात आल्या. काही जणांनी लेक्चर्सचे व्हिडिओ व ऑडिओदेखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. परंतु असा पुढाकार घेणाऱ्यांची संख्या मर्यादितच होती.
परंतु इतरही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन कंटेंटची मागणी होत होती. शिवाय विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील यासाठी विद्यापीठांनी विशेष प्रयत्न करावे असे दिशानिर्देश जारी केले होते. ही बाब लक्षात ठेवून नागपूर विद्यापीठाने ई-शिक्षा नावाचे विशेष पोर्टल विकसित केले. या पोर्टलवर प्राध्यापकांना घरुनच लेक्चर्सचे व्हिडिओ व ऑडिओ अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
स्मार्टफोनवरदेखील होऊ शकतो अभ्यास
ई-शिक्षा पोर्टलवरील सर्व कंटेंट हा विद्यार्थ्यांना संगणक, लॅपटॉपवर पाहता येऊ शकतो. याशिवाय स्मार्टफोनवरच्या माध्यमातूनदेखील विद्यार्थी अभ्यास करू शकणार आहेत.