ई - लायब्ररीतून भविष्यात प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:10 PM2019-09-13T23:10:38+5:302019-09-13T23:11:06+5:30
महापालिकेच्या माध्यामातून बजेरियासारख्या भागात उभारण्यात येणाऱ्या ई -लायब्ररीतून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या माध्यामातून बजेरियासारख्या भागात उभारण्यात येणाऱ्या ई -लायब्ररीतून भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी घडतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला. बजेरिया येथील ई -लायब्ररीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, आमदार विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त अझिझ शेख आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, या लायब्ररीच्या माध्यमातून भविष्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील. येथून भविष्यात उत्कृष्ट दर्जाचे इंजिनिअर, वैज्ञानिक, डॉक्टर तयार होतील, असा मला विश्वास आहे. नागपूरचा विकास हा केवळ रस्ते, उद्याने यापुरता मर्यादित न राहता चौफेर विकास व्हायला पाहिजे. त्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा या सर्व क्षेत्रातील विकास आवश्यक आहे.
प्रास्ताविकातून दयाशंकर तिवारी यांनी ई -लायब्ररी तयार करण्यामागील पार्श्वभूमी आणि सविस्तर माहिती दिली. ही लायब्ररी एका ग्रीन इमारतीत आहे. या लायब्ररीला आयआयटी खरगपूरशी जोडण्यात आलेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांंना ज्ञानार्जनासाठी पूर्ण सहकार्य मिळेल. या लायब्ररीमध्ये ब्रेल लिपी असणाºया संगणकाचा समावेश करण्यात आल्याची माहिती दिली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव या लायब्ररीला देण्यात येणार आहे. लायब्ररीवर ५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. तीन मजल्याच्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १२५ विद्यार्थी बसू शकतील असा हॉल, दुसऱ्या मजल्यावर २५ संगणक व एकत्रित अभ्यासाची सुविधा, कार्यालय, तिसऱ्या मजल्यावर सौर ऊर्जेचे पॅनल राहणार आहे.भविष्यात अटलजींसारखे प्रज्ञावंत विद्यार्थी या लायब्ररीतून घडावे हा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या लायब्ररीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच कोटीच्या निधीला मंजुरी दिली होती.
हा प्रकल्प मुख्य अभियंता उल्हास देबडवार, मनोज तालेवार यांच्या नेतृत्वात उपअभियंता रवि बुंदाडे, कनिष्ठ अभियंता सुरेंद्र दुधे, स्थापत्य सहायक सुनील दुमाने यांच्या निरीक्षणात तयार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नगरसेविका सरला नायक, रूपा राय, विलास त्रिवेदी, राजेश बागडी, अर्चना डेहनकर, बंडू राऊत आदी उपस्थित होते.