अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी ई-पासची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:57 PM2020-04-13T23:57:51+5:302020-04-13T23:59:35+5:30
लॉकडाऊनच्या काळात धान्य, भाजी, औषधे, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बियाणे, खत, शेतीची अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आरटीओ कार्यालयाने ई-पासची व्यवस्था केली आहे. क्षेत्रीय वाहतूक कार्यालयाने यासाठी ‘ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’या वेबसाईटवर अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात धान्य, भाजी, औषधे, किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बियाणे, खत, शेतीची अवजारे यांच्या वाहतुकीसाठी आरटीओ कार्यालयाने ई-पासची व्यवस्था केली आहे. क्षेत्रीय वाहतूक कार्यालयाने यासाठी ‘ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन’या वेबसाईटवर अर्ज स्वीकारणे सुरू केले आहे.
वेबसाईटवर ही नोंदणी करताना गुडस् व्हेईकल, एमएच ३१ ए, एमएच ४० या एमएच किंवा एमएच ४९ संबंधित कार्यालय सिलेक्ट करावे लागणार आहे. त्यानंतर वाहन मालक, चालकाचे नाव (लायसन्स नंबरसह), रजिस्टर्ड मोबाईल नंबर, दोघांचाही ई-मेल आयडी, वाहन क्रमांक, चेसिस क्रमांक (अखेरचे पाच आकडे), वाहनाचा प्रकार, वाहनातील माल, ई-पासचा कालावधी आदींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेनंतर वर्ड व्हेरिफिकेशन कॅरेक्टर भरून अर्ज सबमिट करावा लागणार आहे. तो पास होण्यासाठी अप्लिकेशन रेफरन्स नंबर जनरेट होईल. ई-पास जनरेट झाल्यावर त्याला पीडीएफ स्वरूपात अर्जदाराच्या मेलवर पाठविता येईल. अर्जदार तो डाऊनलोड करून त्याचे प्रिंटआऊट काढू शकेल.
वाहनांना मिळाली परवानगी
२६ मार्च ते ११ एप्रिल या काळामध्ये नागपूर आरटीओ कार्यालयाकडून भाजीच्या वाहतुकीसाठी ७६, धान्यासाठी १४८, किराणा २१०, दूध व दुग्धजन्य पदार्थासाठी ३४,औषधांसाठी ६० तसेच बियाणे, खत व शेतीच्या अवजारांच्या वाहतुकीसाठी १५३ तसेच अन्य वस्तूंच्या वाहतुकीसाठी ९९ अशा एकूण ८३० वाहनांना परवानगी दिली आहे.