प्रत्येक कॉलेजला लावावी लागणार ५०० झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:55 AM2019-05-16T11:55:16+5:302019-05-16T11:56:44+5:30
२०१९ या वर्षभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वनविभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. यालाच हातभार लागावा यासाठी ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१९ या वर्षभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वनविभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. यालाच हातभार लागावा यासाठी ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेतला आहे. ‘डीटीई’च्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी प्रत्येकी ५०० वृक्षांची लागवड करावी, असे निर्देश नुकतेच देण्यात आले आहेत. नागपूर विभागातील सर्व अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए व एमसीए संस्थांच्या प्राचार्यांना यासंदर्भातील पत्रदेखील पाठविण्यात आले आहेत.
३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयांमधील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांची वनविभागातर्फे तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर ‘ग्रीन आर्मी’ म्हणून नोंदणी करायची आहे. याशिवाय वृक्षारोपणासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांबाबतचा अहवालदेखील सादर करायचा आहे. यासंदर्भात ‘डीटीई’ने २४ एप्रिल रोजीच सर्व महाविद्यालयांना पत्र लिहिले होते. मात्र बहुतांश जणांनी हे पत्र गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे विभागीय प्रभारी सहसंचालक डॉ.चंद्रशेखर थोरात यांनी सर्व महाविद्यालयांची पत्र लिहून यासंदर्भात विचारणा केली आहे. शासन तसेच महसूल विभागाकडून अहवालासंदर्भात वारंवार विचारणा होत आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी खड्ड्यांची माहिती संकेतस्थळावर ‘अपलोड’ करावी तसेच ‘डीटीई’ला सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत विभागाला २६ हजार ६०० झाडे लावायची आहेत. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाने ५०० झाडे लावावी, अशी सूचनादेखील डॉ.थोरात यांनी दिली आहे. केवळ लेखी माहिती न देता संबंधित वृक्षारोपणाची छायाचित्रेदेखील सादर करावीत तसेच सर्व संस्थांनी निर्देशांचे पालन करावे व पर्यावरण संवर्धनास मदत करावी, असे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.
अगोदरच्या मोहिमांचे काय झाले ?
२०१३ सालीदेखील राज्य शासनाच्या पुढाकारानंतर ‘डीटीई’ने सर्व महाविद्यालयांना प्रत्येक १०० वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्याचा अहवालदेखील महाविद्यालयांकडून मागविला होता. मात्र अनेक महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्षच केले. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तसेच महाविद्यालयांनी लावलेल्यापैकी नेमके किती वृक्ष जगले याची माहितीदेखील उपलब्ध नाही.